नवी मुंबईच्या राजकारणात सत्ताधारी पक्षातच मतभेद उघड झाले आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. विकासाची कामे मुद्दाम रखडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची गरज असताना ती कामे पुढे सरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
म्हात्रे यांनी आपल्या भाषणात काही प्रकल्पांचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील पहिला आणि देशातील दुसरा मरीना प्रकल्प आपण आणल्याचे त्यांनी सांगितले. त्या प्रकल्पाचे कामही अडवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र भवनाचे काम सुरू असून प्रत्येक कामात अडथळे आणले जात असल्याचे त्यांनी म्हटले.
रुग्णालयाचा प्रस्ताव का रखडला?
नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्याच बैठकीत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा म्हात्रे यांना होती. मात्र हा प्रस्ताव एका अपक्ष नगरसेवकाच्या माध्यमातून आणण्यात आला आणि रुग्णालय होऊ नये, असा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आयुक्तांना काम सुरू करण्याचे सांगितले, तरीही प्रस्ताव रखडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
आयुक्त कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांशी तीन-चार वेळा बोलूनही फाइल पुढे सरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपची सत्ता असूनही भाजपच्याच लोकांकडून कामांना विरोध होत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांचा डीएनए तपासला पाहिजे, ते खरेच भाजपचे आहेत का, असा खोचक सवाल त्यांनी केला.
स्टेडियमवरूनही आरोप-प्रत्यारोप
मुख्यमंत्र्यांनी स्टेडियमसाठी 20 कोटी रुपये दिल्याचा उल्लेखही म्हात्रे यांनी केला. ते मैदान खेळाचे नव्हते, तर खड्डा भरून तिथे खेळले जात होते आणि त्याचा व्यावसायिक वापर होत होता, असे त्या म्हणाल्या. तिथून कंपन्यांकडून पाच ते दहा लाख रुपये मिळत होते, असा आरोप त्यांनी केला. तेच लोक आपल्याविरोधात पाठवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
रुग्णालयाचे काम सुरू झाले की टक्केवारी मागण्यासाठी आणि काम आपल्या कंत्राटदाराला देण्यासाठी नगरसेवक येतील, असा आरोपही म्हात्रे यांनी केला. कोणत्याही नगरसेवकाच्या विभागात काम झाले तर त्या नगरसेवकाला विरोध करायला लावले जाते, असे त्या म्हणाल्या. भाजपमध्ये येऊन भाजपच्याच आमदाराला विरोध करणारे खरेच भाजपचे आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Leave a Reply