उत्तर प्रदेशातील मतदार यादीतून कोट्यवधी हिंदू मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १.२७ कोटी हिंदू मतदारांची नावे हटवण्यावरून चिंता व्यक्त केली आहे. हिंदू मतदारांची नावे गायब झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजपने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १० हजार ते २५ हजार मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्याचा मानस ठेवला आहे. गायब मतदारांपैकी ४० ते ८० लाख मते समाविष्ट व्हावीत, यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.
भाजपने आखला निवडणुकीसाठी मोठा प्लान
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील ४०३ विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित करून अभियान चालवले जाणार आहे. भाजपच्या दाव्यानुसार, प्रत्येक मतदारसंघातील ३१ हजारांहून अधिक मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत. त्यामुळे भाजप प्रत्येक मतदारसंघातील १० हजार ते २५ हजार पात्र मतदारांचे नाव पुन्हा यादीत समाविष्ट करण्याचा मानस ठेवत आहे. पक्षातील नेत्यांनी बुथ पातळीवर मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, त्यानंतर फॉर्म भरण्याचे निर्देशही दिले आहेत. एका नेत्याच्या दाव्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी कामाला शेवटची संधी असल्याचे कार्यकर्त्यांना म्हटले आहे. शेवटच्या एका महिन्यात चांगला लाभ घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
मतदार यादीवर पुढील महिनाभर लक्ष
एसआयआरनंतर १७ नोव्हेंबर रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध केला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून २० नोव्हेंबरपासून एक अभियान राबवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने पुढील एका महिन्यासाठी मतदार यादीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौमध्ये शुक्रवारी भाजपची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि प्रभारींना महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी उपस्थित होते. उत्तर प्रदेशात पुढील वर्षापासून विधानसभा निवडणुकींमुळे घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांनीही प्रयत्न सुरू केले आहेत.
Leave a Reply