आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ एक भीषण रस्ते अपघात झाला असून या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोलाघाट जिल्ह्यातील रंगाजान भागात ट्रॅव्हलर व्हॅन आणि कंटेनर ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात २४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन सेकंदांत घडला भीषण अपघात
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक पांढरी ‘टेम्पो ट्रॅव्हलर’ वाहन अतिशय वेगाने पुढे जाताना दिसते. समोर एक कंटेनर ट्रक येतो आणि काही क्षणांतच व्हॅनची त्या ट्रकशी जोरदार धडक होते. ही संपूर्ण घटना अवघ्या दोन सेकंदांत घडली. धडक होताच व्हिडिओमध्ये एक प्रखर प्रकाश चमकताना दिसतो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. बळी पडलेल्यांपैकी अनेकजण महाविद्यालयीन विद्यार्थी होते, जे वर्ग संपल्यानंतर घरी परतत होते. वाहनातील बहुतेक प्रवासी तरुण असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री घटनास्थळी भेट देणार
काझीरंगा येथे झालेल्या रस्ते अपघाताबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, ते उद्या काझीरंगाला भेट देणार आहेत. ही घटना कशी आणि का घडली, याची चौकशी सरकारतर्फे केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घटनास्थळी भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply