अनेक वर्षांपासून उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या भागात प्रामुख्याने रात्रीच्या वेळी पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी जागरण करावे लागत आहे. त्यामुळे हा परिसर पाण्याच्या समस्येसाठी ओळखला जाऊ लागला आहे.
‘पाणीवाले बाबा’ म्हणून परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे हे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाणी सोडण्याची वेळ समाजमाध्यमांवरून नागरिकांना कळवतात. त्यामुळे नागरिकांना पाणी भरणे शक्य होत असले, तरी पाणीपुरवठ्याची एक निश्चित वेळ ठरवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संध्याकाळी सहापासून प्रतीक्षा, पाणी मात्र उशिरा
दहाचाळ, भीमशक्ती, डिफेन्स, अशोक वन, बुद्ध कॉलनी, महात्मा फुले कॉलनी, सर्टिफाय स्कूल, सुभाष टेकडी, साईबाबा, आम्रपाली, पंचशील, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी, गुरुद्वारा आदी परिसरांत सायंकाळी सहा वाजल्यापासून पाण्याची प्रतीक्षा सुरू होते. मात्र, प्रत्यक्षात कधी रात्री नऊ, कधी अकरा, तर कधी त्याहून उशिरा पाणी सोडले जाते.
त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन वेळापत्रक विस्कळित होत आहे. पाणी येण्याची वेळ आधीच कळल्यास नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करता येतो. मात्र, वेळ निश्चित नसल्याने त्यांना झोपमोड करून पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन नियमित वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी संजय वाघमारे यांनी केली आहे.
कमी दाबामुळे वेळेत बदल होत असल्याचे स्पष्टीकरण
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले आणि उपअभियंता दीपक ढोले यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यास पाणी भरण्यास अडचणी येतात. त्यामुळे पाणी सोडण्याच्या वेळेत बदल होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply