ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्था आणि सेवाभावी संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांचे मनोबल वाढवण्याबरोबरच त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळावेत आणि उपचारानंतर पुनर्वसनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यावर भर देण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. निपुण विनायक यांनी हे आवाहन केले. सरकारकडून या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. मात्र केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता सामाजिक संस्थांनीही या कामात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून रुग्ण उपचारानंतर व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर स्वावलंबी होतील आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात परतू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रुग्णालयात उपचारांबरोबरच कौशल्यविकासावर भर
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात औषधोपचारांबरोबरच व्यवसायोपचार, जीवनकौशल्य प्रशिक्षण आणि पुनर्वसन यावर भर दिला जात आहे. डॉ. विनायक यांनी दिवाळीच्या काळात रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी स्त्री व पुरुष रुग्णकक्ष, आरोग्य सुविधा, उपचारपद्धती आणि पुनर्वसन प्रक्रियेची पाहणी केली. महिला व्यवसायोपचार विभागातील कौशल्यविकास उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पुढील महिन्यात रुग्णांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचे आवाहन डॉ. विनायक यांनी केले. यासंदर्भात चर्चा करून नियोजन करण्यासाठी पुढील महिन्यात ते पुन्हा रुग्णालयाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी रुग्णालयातील विविध सेवांची माहिती दिली.
रुग्णांशी मनमोकळा संवाद
पाहणीदरम्यान डॉ. विनायक यांनी रुग्णांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी रुग्णांच्या वैयक्तिक व कौटुंबिक परिस्थितीची विचारपूस केली. उपचार, औषधे, आहार आणि सुविधांबाबत माहिती घेतली. रुग्णांनीही मिळणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. मनोरंजनगृहात रुग्णांनी मराठी व हिंदीतील जुनी गाणी आणि प्रार्थना सादर करून आपल्यातील कलागुणांची झलक दाखवली.
या वेळी आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. सुनील भोकरे, उपसचिव राजश्री सारंग, अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य) डॉ. श्रीनिवास कोलोड, राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाच्या सदस्य अनुराधा बिडवे, अकीला महेश्वरी, सरस्वती सुरेश, अगस्तू फाऊंडेशन व बॅनियान संस्थेचे प्रतिनिधी, तसेच डॉ. सुहास माने, डॉ. अमोल भुसारे, डॉ. प्राची चिवटे, यशोदा नाईक आणि रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply