पाच वर्षांखालील बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यात गुरुवार, १२ तारखेपासून सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘सांन्स’ अभियान सुरू झाले आहे. ही मोहीम २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली. या मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती, आजाराचे वेळीच निदान, योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जाणार आहे.
न्यूमोनिया म्हणजे काय आणि धोका कोणाला
न्यूमोनिया हा फुफ्फुसांना होणारा एक गंभीर संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये फुफ्फुसांमधील ऑक्सिजनची देवाणघेवाण करणाऱ्या पिशव्यांमध्ये द्रव किंवा पू साचल्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि श्वास घेण्यास त्रास होतो. जिवाणू आणि विषाणूंमुळे होणाऱ्या या आजाराचा धोका प्रामुख्याने पाच वर्षांखालील बालके, कमी वजनाची व कुपोषित बालके, अपूर्ण लसीकरण झालेली बालके, तसेच धुराच्या संपर्कात राहणाऱ्या बालकांना सर्वाधिक असतो.
न्यूमोनियाची प्रमुख लक्षणे
लहान बालकांमध्ये खोकला आणि ताप येणे, श्वास घेण्याचा वेग वाढणे व श्वास घेताना छातीचा खालचा भाग आत ओढला जाणे, श्वास घेताना घरघर किंवा असामान्य आवाज येणे, बालकाला दूध पिण्यास किंवा खाण्यास त्रास होणे, बालक सुस्त होणे, प्रतिसाद न देणे किंवा ओठ व जीभ निळसर पडणे अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी विलंब न करता तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन त्यानुसार उपचार केले जावेत.
प्रतिबंधात्मक उपाय काय
जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करावे. पहिले सहा महिने बालकाला केवळ आईचे दूध द्यावे आणि त्यानंतर वयानुसार सकस पूरक आहार द्यावा. बालकांचे शासनाच्या वेळापत्रकानुसार संपूर्ण लसीकरण करावे; विशेषतः न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचे डोस पूर्ण करावेत. घरात स्वच्छ हवा खेळती ठेवावी, धूम्रपान टाळावे, घराजवळ कचरा जाळणे टाळावे. जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुवावेत, तसेच खोकताना व शिंकताना रुमालाचा वापर करावा.
अभियानांतर्गत उपक्रम
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आशा स्वयंसेविकांमार्फत गृहभेटी देऊन बालकांची तपासणी केली जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णांसाठी मोफत तपासणी, उपचारासह आवश्यक औषधे आणि ऑक्सिजन सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. तसेच माता बैठका, ग्रामसभा आणि जनजागृती कार्यक्रमांद्वारे पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण करू या, प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवू या’, असा संदेश देत बालकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार करून वेळ न घालवता तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र किंवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बोडके यांनी केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply