शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मौसमी चटर्जी यांचे पती जयंत मुखर्जी यांचे निधन

प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांचे पती आणि सिनेनिर्माते जयंत मुखर्जी यांचे 12 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मौसमी चटर्जी यांचे पती जयंत मुखर्जी यांचे निधन

बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मौसमी चटर्जी यांचे पती आणि सिनेनिर्माते जयंत मुखर्जी यांचं निधन झालं आहे. गुरुवारी 12 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. वार्धक्य आणि आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी मुखर्जी यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.

जयंत मुखर्जी यांनी राहत्या घरीच अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समोर आलं नाही. त्यांच्या कुटुंबाकडूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच मुखर्जी यांच्यावरील अंत्यसंस्काराची माहितीही देण्यात आलेली नाही.

## अनेक सिनेमांची निर्मिती

जयंत मुखर्जी हे बॉलिवूडमधील एक मोठं नाव होतं. त्यांनी मजाक, दो लडके दोनों कडके आणि बीवी और मकान सारख्या सिनेमांची निर्मिती केली होती. मजाक आणि दो लडके दोनों कडके या दोन्ही सिनेमात मौसमी चटर्जी या मुख्य भूमिकेत होत्या. याशिवाय त्यांनी 1992 मध्ये तलाश या टीव्ही सीरिअलची निर्मितीही केली होती.

## संगीताशी अतूट नातं

जयंत मुखर्जी यांचं संगीताशी अतूट नातं होतं. ते प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार यांचे चिरंजीव होते. त्यांनी वडिलांचा संगीताचा वारसा जपला होता. बीवी और मकान या सिनेमात त्यांनी म्यूझिक डिपार्टमेंटमध्येही काम केलं होतं. केवळ सिने निर्मितीतच ते गुंतले नाहीत, तर संगीताच्या क्षेत्रातही त्यांचा वावर होता.

## वयाच्या 15 व्या वर्षी लग्न

मौसमी चटर्जी आणि जयंत यांच्या लग्नाचा किस्सा अजब आहे. दोघांनी 1972 मध्ये लग्न केलं होतं. त्यावेळी मौसमीचं वय केवळ 15 वर्ष होतं. त्यावेळी त्या इयत्ता दहावीत शिकत होत्या. आपल्या मावशीची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अत्यंत कमी वयात लग्न केलं होतं. म्हणजे लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपुष्टात येतं असं सांगितलं जातं. त्यामुळे अनेक अभिनेत्री त्यावेळी उशिराने लग्न करत होत्या. पण मौसमी यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी लग्न करून सर्वांना चकित करून सोडलं होतं. एवढेच नव्हे तर लग्नानंतरही करिअर होतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं. 70-80 च्या दशकात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना व्हायची.

## मुलीचंही निधन

जयंत आणि मौसमी यांना दोन मुली आहेत. पायल आणि मेघा मुखर्जी. यापूर्वी त्यांची मुलगी पायल हिचं 13 डिसेंबर 2019 मध्ये वयाच्या 45 व्या वर्षी निधन झालं होतं. त्या बराच काळ कोमात होत्या. आधीच मुलगी गेल्यानंतर आता पतीनेही साथ सोडल्याने मौसमी यांच्यावर दु:खाचा पहाडच कोसळला आहे.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance