राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार गटातील नेत्यांच्या शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटींमुळे या चर्चांना आणखी जोर मिळाला होता. मात्र आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादा हयात असताना विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र त्यांच्या निधनानंतर माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
माझ्याकडे कोणताही प्रस्ताव नाही
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. माझ्याशीही याबाबत कोणी चर्चा केलेली नाही. शरद पवार यांना अनेक लोक भेटत असतात. त्यात काही नवीन किंवा चुकीचे नाही. अजित पवार यांचा गट वेगळा झाला होता, तेव्हाही अनेक नेते पवार यांना भेटत होते. दुसऱ्या पक्षात काय सुरू आहे, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यात आपण कशाला लक्ष घालायचे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
माझा भाऊ गेला, त्याच दिवशी विषय संपला
सुप्रिया सुळे यांनी यावेळी अजित पवार यांच्या निधनाचा उल्लेख करत भावनिक प्रतिक्रिया दिली. ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच दिवशी मी या विषयावर पडदा टाकला. दादा होते तोपर्यंत विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. आम्ही काय करणार आहोत, हे जगाला माहिती होते. पण माझा भाऊ गेला आणि विषय संपला, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवा संदर्भ मिळाला आहे.
चर्चांना वेग का आला होता
दरम्यान, अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अलीकडे विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच अजित पवार गटातील काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला होता. दोन्ही राष्ट्रवादींच्या काही नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. मात्र सुप्रिया सुळे यांनी कोणताही अधिकृत प्रस्ताव आल्याचे नाकारले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सध्या तरी कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही. दोन्ही गटांचे वरिष्ठ नेते पुढे काय भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply