राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणासंदर्भात आपल्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
अजित पवार असताना त्यांनी विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू केले होते, असे सुळे म्हणाल्या. याबाबत आपण यापूर्वीही बोललो असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र अजित दादा गेल्यानंतर आतापर्यंत आपल्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शरद पवारांना भेटणारे आमदार
अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार यांना जाऊन भेटले होते. त्यानंतर विलीनीकरणाच्या चर्चांना अधिक वेग आला होता. याबाबत सुळे म्हणाल्या की, पवार साहेबांना अनेक लोक भेटत असतात. त्यामुळे यात नवीन किंवा वेगळे काही नाही. अजित पवारांचा गट वेगळा झाला तेव्हाही अनेक लोक पवार साहेबांना भेटायचे, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या पक्षामध्ये काय सुरू आहे, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आपण त्यांच्या पक्षात कशाला डोकावायचे, असा सवालही सुळे यांनी केला.
भाऊ गेला तेव्हाच विषय संपला
ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्यादिवशी मी या विषयावर पडदा टाकला, असे सुळे भावूक होऊन म्हणाल्या. माझा भाऊ गेला तेव्हाच विषय संपला. दादा होते तोवर चर्चा होती. दुनियेला माहीत होते की आम्ही काय करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अलीकडेच विलीनीकरणाच्या चर्चांवर विधाने केली होती. त्यामुळे दोन्ही पक्ष विलीनीकरणाच्या दिशेने असल्याची आणि दिल्लीतून यासाठी सूत्रे हलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र सुळे यांनी आता कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply