आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. तारुण्यात माणसाने कसे जगावे, काय करावे आणि काय करू नये, याबद्दलही चाणक्य नीतीमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
चाणक्य म्हणतात, माणसाला मिळालेले तारुण्य ही या जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. तारुण्यात तुम्ही तुम्हाला हवी ती गोष्ट करू शकता. जिथे लाथ माराल तिथून पाणी काढण्याची हिंमत तारुण्यात तुमच्याकडे असते. तारुण्यात माणसाकडे पैसा, शक्ती आणि सत्ता अशा सर्वच गोष्टी असतात. त्यामुळे तारुण्य हे माणसाला मिळालेले वरदान असले, तरी त्याचा योग्य पद्धतीने उपयोग झाला नाही तर ते तुमच्यासाठी शापही ठरू शकते, असे चाणक्य यांनी म्हटले आहे. म्हणून नेहमी चार गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
चाणक्य सांगतात या चार गोष्टी
पैसा: चाणक्य म्हणतात, तारुण्यात तुम्ही प्रचंड पैसा कमावता. परंतु या पैशाचे योग्य व्यवस्थापन तुम्हाला जमले पाहिजे. कुठे किती पैसा खर्च करायचा आणि कुठे बचत करायची, हे गणित ज्याला जमते तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो, असे चाणक्य यांनी म्हटले आहे.
ताकद: तरुणपणात माणसाच्या अंगात खूप ताकद आणि प्रचंड ऊर्जा असते. परंतु या ऊर्जेचा वापर कधीही एखाद्या व्यक्तीवर अन्याय करण्यासाठी होऊ देऊ नका. त्या ऊर्जेचा वापर दुर्बलांचे संरक्षण करण्यासाठी करा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
घाईत निर्णय घेणे टाळा: तरुणपणात अनेकदा आपण बरेच निर्णय खूप घाईने घेतो. त्याचे परिणाम भविष्यात काय होतील, याचा आपण कधीही विचार करत नाही. मात्र यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणतेही निर्णय घाईत घेणे टाळा, असे चाणक्य म्हणतात.
नाती जपा: तारुण्यात प्रत्येकाची भावना हीच असते की आपल्याला कोणाची गरज नाही. परंतु वस्तुस्थिती ही असते की तुम्हाला भविष्यात प्रत्येकाची गरज लागणारच असते. त्यामुळे तारुण्यात नाती जपा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
वरील माहिती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. यातील तथ्यांबद्दल कोणताही दावा केला जात नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply