जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. गुरुवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत २१ जागांच्या वाटपावर निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजप दहा जागा, शिवसेना सात जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढवणार आहे. जळगाव एमआयडीसीतील बालाणी लॉन्समध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक गुरुवारी झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्यासह महायुतीचे आमदार, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे बैठकीला उपस्थित होते.
दोन जागांवर चर्चा सुरूच
बैठकीत विविध कार्यकारी संस्थांसह राखीव जागांवर नेत्यांमध्ये चर्चा झाली. यात प्रामुख्याने पाचोरा आणि मुक्ताईनगर विविध कार्यकारी संस्थेच्या जागेवरून चर्चेचा खल सुरूच राहिला. दरम्यान, विरोधकांना सोबत घेऊन सर्वपक्षीय पॅनल झाल्यास जागावाटपाचे सूत्र बदलण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
माघारीची मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इतर संस्था मतदारसंघातून अनिल वसंत पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. माघारीची अंतिम मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत आहे. १६ व १७ नोव्हेंबरला माघारीसाठी मोठी धावपळ होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply