रिअॅलिटी शो बिग बॉस २० सध्या घरातील वादांमुळे चर्चेत आहे. शोमध्ये दररोज स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं होताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या एका भागात माही विजने ‘घर तोडणारी’ असा शब्द वापरल्यानंतर वाद पेटला. त्यानंतर रोबोट टास्कदरम्यान हा वाद आणखी वाढला. या टास्कमध्ये रोबोटच्या खुर्चीवर बसलेल्या स्पर्धकाला रडवण्याचे आव्हान होते. माहीला रडवण्यासाठी कनिका मानने तिच्या मुलीचा उल्लेख केला. या प्रकारामुळे माहीचा माजी पती आणि अभिनेता जय भानुशाली चांगलाच संतापला आहे.
जय भानुशालीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत बिग बॉस २० मधील स्पर्धकांवर नाराजी व्यक्त केली आहे. रिअॅलिटी शोमधील भांडणात लहान मुलांना ओढणे चुकीचे असल्याचे त्याने स्पष्ट केले. इतकेच नाही, तर यापुढे आपल्या मुलांना हा शो पाहू देणार नसल्याचा निर्णयही त्याने घेतला आहे.
वडील म्हणून भूमिका मांडली
जयने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली. तो म्हणाला की, त्याची मुले हा शो पाहतात आणि त्याबद्दल त्याला प्रश्न विचारतात. त्याने सर्वांना विनंती केली की, त्याला किंवा त्याच्या मुलांना या नकारात्मकतेत ओढू नये. ही पोस्ट जय भानुशाली म्हणून नाही, तर मुलांचा वडील म्हणून लिहित असल्याचे त्याने सांगितले.
यासोबतच जयने माही विज आणि आपल्या मुलांचा फोटो शेअर करत एक लांबलचक नोट लिहिली. बिग बॉसच्या घरात माहीच्या खेळावर टीका करण्याचा प्रत्येक स्पर्धकाला अधिकार आहे; मात्र तिच्या मातृत्वावर प्रश्न उपस्थित करताना मुलीचा उल्लेख करणे त्याला अजिबात मान्य नाही, असे त्याने स्पष्ट केले.
मुलांना शो पाहू देणार नाही
जयने पोस्टमध्ये लिहिले की, बिग बॉसमध्ये घडणाऱ्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर एक वडील म्हणून त्याने निर्णय घेतला आहे की, यापुढे तो आपल्या मुलांना बिग बॉस पाहू देणार नाही. कोणाच्याही खेळावर भाष्य करणार नाही किंवा कोणत्याही विशिष्ट स्पर्धकाबद्दल मत मांडणार नाही, असेही त्याने ठरवले आहे. मात्र, जिथे गरज असेल तिथे माहीला पाठिंबा देईन, असे त्याने सांगितले.
यंग डीएसए आणि कनिका मान यांनी तारा मोठी झाल्यानंतर तिच्या आईच्या वागण्यामुळे तिला लाज वाटेल, अशा आशयाची वक्तव्ये केल्याबद्दलही जयने नाराजी व्यक्त केली. कनिकाने माहीच्या मुलांना कधीही भेटण्याची इच्छा नसल्याचे म्हटले होते. तर लव गिलच्या आईनेही या चर्चेत जय आणि माहीच्या मुलीचा उल्लेख केला. रिअॅलिटी शोमधील वादात लहान मुलांना का ओढले जात आहे, असा सवाल जयने उपस्थित केला.
तारा ही सात वर्षांची मुलगी आहे, बिग बॉसची स्पर्धक नाही. एखाद्या लहान मुलाला दुसऱ्याचा अपमान करायला सांगणे हा निव्वळ मूर्खपणा असल्याचे जयने म्हटले आहे. जयच्या या पोस्टनंतर बिग बॉस २० मधील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्पर्धकांच्या खेळावर आणि वागण्यावर टीका होऊ शकते; मात्र त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांना या वादात ओढणे कितपत योग्य, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply