दिवाळीच्या सणात फटाके फोडल्यामुळे देशातील अनेक शहरांत आणि गावांत हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्याचबरोबर आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात चिंता व्यक्त होत असतानाच काही नेत्यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. लखनऊ येथील एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रदूषण तात्पुरते, काळजी कशाला?
दिवाळीच्या सणात प्रदूषण होते, अशी अनेकांची तक्रार असते. प्रदूषण होते हे मला मान्य आहे. पण ते आपोआप निघूनही जाते. मग त्याची इतकी काळजी का करायची, असा सवाल आदित्यनाथ यांनी उपस्थित केला. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते आणि ते कायमस्वरूपी नसते, असे मत त्यांनी मांडले. सामान्य नागरिक वर्षातून एकदा सण साजरा करतात. त्याबद्दल विरोधकांकडून होणारी टीका चूक असल्याचेही त्यांनी सांगितले.
जगातील सर्वाधिक प्रदूषित शंभर शहरांमध्ये भारतातील त्र्याण्णव शहरांचा समावेश असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेचा मुद्दा केवळ दिवाळीपुरता मर्यादित नाही, हेही या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहे. फटाके फोडल्याने रोगराई दूर होते, असे वक्तव्य एका आमदाराने यापूर्वी केले होते. तर दुसरीकडे दिवाळी हा मानव निर्मित रोग असल्याचे वादग्रस्त विधान एका खासदाराने केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे.
विरोधकांवर निशाणा
या कार्यक्रमातून आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, यापूर्वी २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात सणासुदीच्या काळात दंगली व्हायच्या आणि संचारबंदी लागू असायची. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या उत्साहावर पाणी फिरायचे, तर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान व्हायचे. मात्र गेल्या काही वर्षांत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे सुधारली आहे. त्यामुळे नागरिक कोणतीही भीती न बाळगता सण उत्साहाने साजरे करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता हळूहळू सुधारते, असा त्यांचा दावा आहे. मात्र हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल तज्ज्ञांकडून सातत्याने इशारे दिले जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर चर्चा रंगली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply