भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळतात. त्यापैकी काही विषारी असतात, तर काही बिनविषारी असतात. प्रत्येक प्रजातीचे वैशिष्ट्य वेगळे असते. काही साप थेट पिल्लांना जन्म देतात, तर काही साप अंडी घालतात. सापांना अंडी घालण्यासाठी किंवा पिल्लांना जन्म देण्यासाठी एक ठरावीक हंगाम असतो. काही साप एकाच वेळी तीस ते चाळीस पिल्लांना जन्म देऊ शकतात, त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते.
घराच्या आसपास साप दिसणे ही अनेकांसाठी चिंतेची बाब असते. साप सहसा अंडी घालण्यासाठी अशी जागा निवडतात, जिथे कायम ओलावा असतो आणि वातावरणात आर्द्रता असते. तिथली जमीन भुसभुशीत असते आणि जवळपास उंदरांची बीळं असतात. सापाने एकदा अंडी घातल्यानंतर तो तिथून फार दूर जात नाही, तो त्याच परिसरात राहतो, जेणेकरून त्याला लवकर शिकार मिळेल. त्यामुळे उंदीर किंवा पक्ष्यांची घरटी असलेल्या ठिकाणी साप अंडी घालण्याची शक्यता जास्त असते.
बांबू आणि वडाची झाडे का धोकादायक ठरतात?
बांबूच्या झाडाच्या मुळाशी नेहमी ओल असते. त्यामुळे साप शक्यतो बांबूच्या परिसरात अंडी घालतात. तिथे दाट पालापाचोळा पडत असल्यामुळे उंदीर आणि घुशी यांसारख्या प्राण्यांची संख्याही अधिक असते. बांबूप्रमाणेच ज्या वडाच्या झाडाचा घेर मोठा असतो, अशा झाडाखालीही लवकर कोणाची नजर पडणार नाही, अशा ठिकाणी साप अंडी घालू शकतात. म्हणून घराच्या जवळ ही दोन झाडे असतील, तर तिथे साप दिसण्याची शक्यता वाढते.
सापाची अंडी आणि पक्ष्यांची अंडी यांतील फरक
दूरून पाहिल्यास सापाची आणि पक्ष्याची अंडी सारखीच वाटू शकतात. मात्र जवळून पाहिल्यास त्यांच्यातील फरक स्पष्ट दिसतो. पक्ष्याच्या अंड्याचे कवच थोडे टणक असते, तर सापाच्या अंड्याचे कवच चामड्यासारखे असते. ते दाबले तर न तुटता थोडे दबते, तर पक्ष्याच्या अंड्याचे कवच दबत नाही. सापाची अंडी लंबवर्तुळाकार असतात, तर पक्ष्याची अंडी थोडी गोलसर असतात.
कुठेही सापाची अंडी दिसली किंवा साप दिसला, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी. ते सापांना आणि त्यांच्या अंड्यांना सुरक्षित ठिकाणी सोडतात. त्यामुळे तुम्हालाही धोका होणार नाही आणि सापांची अंडीही सुरक्षित राहतील.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply