अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून दिवाळीच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. दिवाळीनिमित्त तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तिने फटाके न फोडता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. या व्हिडीओवरून तिला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेतला होता आणि काही नेटकऱ्यांनी तिच्या धार्मिक ओळखीवरूनही आक्षेप घेतला.
मुंबई महापालिकेने सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेचा भाग म्हणून दियाने व्हिडीओ शेअर केला होता. केवळ दिया नाही, तर माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचेही व्हिडीओ या मोहिमेत होते. दियाने आपल्या व्हिडीओतून फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाबाबत माहिती दिली होती आणि प्रदूषण टाळण्याचं आवाहन केलं होतं.
महापालिकेने व्हिडीओ हटवला; न्यायालयाने नाराजी व्यक्त केली
अमित साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर मुंबई महापालिकेने हा व्हिडीओ हटवला. या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि व्हिडीओ पुन्हा अपलोड करण्याचे आदेश दिले.
विधीवत लक्ष्मीपूजनाचे फोटो शेअर
या वादाच्या पार्श्वभूमीवर दियाने आपल्या घरात विधीवत लक्ष्मीपूजन केलं आहे आणि या पूजेचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती आपल्या कुटुंबासोबत दिसत आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
फोटोंना कॅप्शन देताना दियाने लिहिलं आहे की, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम आणि प्रकाश आपल्या सर्वांवर आणि आपल्या प्रियजनांवर सदैव राहो. तुम्हा सर्वांना प्रेम, उत्तम आरोग्य, शांती आणि समृद्धीने भरलेल्या वर्षाच्या शुभेच्छा. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांचे संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, तू कोणत्याही धर्माची असलीस तरी तुला प्रत्येक सण साजरा करण्याचा अधिकार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply