काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे नवे पुस्तक ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव’ मंगळवारी प्रकाशित झाले आहे. सात भागांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक विषयांवर प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. त्यांच्या खाजगी आणि वेदनादायक काळाचाही यात उल्लेख आहे. मे १९९१ मध्ये त्यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनाशी संबंधित आठवणीही त्यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत.
राजीव गांधी यांच्या निधनाची बातमी मिळण्याआधीचे काही दिवस कसे गेले, याचे वर्णन सोनिया गांधी यांनी पुस्तकात केले आहे. त्या आणि त्यांची मुलगी प्रियंका गांधी निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यावरून नुकत्याच परतल्या होत्या. प्रचारामुळे आलेला थकवा अजूनही गेलेला नव्हता. रायबरेलीमध्ये त्या राजीव गांधी यांना भेटू शकल्या नव्हत्या. दिल्लीतही त्यांच्यासोबत जेमतेम एक दिवस घालवण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर राजीव गांधी पुन्हा प्रचारासाठी रवाना झाले होते. प्रियंका काही दिवस त्यांच्यासोबत थांबली होती. १० मे रोजी रायबरेलीमध्ये वडिलांना भेटण्याची योजना तिच्या मनात होती.
ती भयानक रात्र
सोनिया गांधी यांनी लिहिले आहे की, राजीव गांधी किती थकले होते, हे पाहून त्या हैराण झाल्या होत्या. ते अनेक दिवस सातत्याने प्रचार करत होते आणि संपूर्ण देशाचा दौरा करत होते. ते बाहेर असायचे तेव्हा त्यांना त्यांची चिंता लागलेली असायची. त्या रात्री शयनगृहात टेबल लँपच्या उजेडाने सावल्या लांबल्या होत्या. त्या एक पुस्तक उघडून वाचू लागल्या होत्या. त्यांची मुलगी प्रियंका तिच्या एका मित्राच्या २१ व्या वाढदिवसाच्या पार्टीला जाण्याची तयारी करत होती. प्रियंका बाहेर कमी जायची. मात्र, त्या दिवशी ती वेगवेगळे कपडे परिधान करून सोनिया यांना दाखवत त्यांची प्रतिक्रिया विचारत होती.
काही वेळाने प्रियंकाने हळूच त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि आत आली. ती खूप सांभाळून पावले ठेवत होती, जणू स्वतःला शांत राखण्याचा प्रयत्न करत असावी. परंतु तिचे वेगाने आणि न थांबता श्वास घेणे, उतरलेला चेहरा आणि डोळ्यांतील खोल चिंता सांगत होती की काही तरी खूपच वाईट घडले आहे. त्यानंतर प्रियंकाने तिच्या आईला फोनवर मिळालेली बातमी सांगितली. तिने म्हटले की, आत्ताच एक फोन आला आहे. एक स्फोट झाला आहे आणि सांगितले जात आहे की पापांच्या आसपास उपस्थित १२ लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु ते सुरक्षित आहेत. मात्र, प्रियंका यांना या गोष्टीवर विश्वास नव्हता. तिने आपल्या आईला सांगितले की, जर १२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर पापा देखील जखमी झाले असतील. ते रुग्णालयात असतील. आपल्याला मद्रासला जायला हवे, तुम्ही लवकर तयार व्हा.
सोनिया गांधी यांनी लिहिले आहे की, त्या वेळी त्यांना कळत नव्हते की प्रियंका अखेर काय सांगत आहे. प्रियंका खूप घाईघाईने बोलत होती आणि तिचे बोलणे त्यांना नीटपणे समजून येत नव्हते. मद्रासला काय जायचे आहे? राजीव मद्रास येथे होते का? कोणता स्फोट झाला आहे, असा विचार त्यांच्या मनात आला. प्रियंकाच्या शब्दांपेक्षा तिच्या आवाजात लपलेली भीती त्यांना हे समजण्यास पुरेशी होती की अखेर काही तरी खूप वाईट झाले आहे. हे समजताच त्यांचे श्वास थांबू लागले. त्या बिछान्यावरून उठल्या आणि प्रियंकाच्या जवळ गेल्या, तिला कवेत घेतले. प्रियंकाचे हृदय त्यांच्या छातीशी कवटाळून अधिक वेगाने धडधडत होते, असे त्यांना जाणवले.
प्रियंका त्यांना म्हणाली की, ती कार्यालयात जाऊन चौकशी करते. मिस्टर जॉर्ज म्हणाले होते की, ते सर्व तपशील मिळवून कळवतील, पण अजून त्यांचा फोन आलेला नाही. ते फोनला उत्तरही देत नाहीत. मिस्टर जॉर्ज म्हणजे व्हिन्सेंट जॉर्ज, जे राजीव गांधींचे वैयक्तिक सचिव होते. नंतर त्यांनी सोनिया गांधींसोबतही काम केले. सोनिया गांधींच्या म्हणण्यानुसार, प्रियंका काही वेळाने परत आली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर असे भाव होते, जे सोनियांना लगेच समजले. प्रियंका एका छोट्या खोलीत त्यांच्यासमोर उभी होती. त्यानंतर तिने जे म्हटले, त्याने सोनिया गांधींचे जग हादरवून टाकले. प्रियंका म्हणाली की, “पापा आता राहिले नाहीत.”
दुःखाचा डोंगर कोसळला
सोनिया गांधी यांनी लिहिले आहे की, हे ऐकल्यानंतर त्यांनी प्रियंकाच्या डोळ्यांत पाहिले. त्यांना आशा होती की हे फक्त एक वाईट स्वप्न असावे आणि त्या काही वेळाने जाग्या होतील. पण प्रियंकाच्या डोळ्यांतील वेदना आणि भीतीने सत्य उघड केले. प्रियंकासुद्धा त्यांच्याकडेच पाहत होती आणि तिच्या डोळ्यांत तिच्या आईची भीती स्पष्टपणे दिसत होती.
आपल्या आत्मचरित्रात त्या क्षणाची आठवण सांगताना सोनिया गांधींनी लिहिले आहे की, राजीव गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. त्या आपली मुलगी प्रियंकाच्या मिठीत कोसळल्या आणि वारंवार पुटपुटत राहिल्या, “मी त्यांच्यासोबत जायला हवं होतं. मी त्यांच्यासोबत का नाही गेले?” त्यावेळी प्रियंका शांत होती. सोनिया गांधींनी सांगितले की, त्यांना या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. कदाचित हे खरे नसेल, अशी आशा त्यांनी अजूनही बाळगली होती. अखेरीस, त्यांनी राजीव गांधींचे खाजगी सचिव व्हिन्सेंट जॉर्ज यांना फोन केला आणि विचारले, “फक्त मला सांगा, हे खरं आहे का?” व्हिन्सेंट जॉर्ज यांचा आवाज कापरा झाला. ते म्हणाले, “हो, हे खरं आहे. साहेब आता हयात नाहीत.”
सोनिया गांधींनी लिहिले आहे की, हे ऐकून त्यांचे संपूर्ण जग कोसळले. जणू काही त्यांच्या सभोवताली अंधार पसरला आहे आणि तो अंधार त्यांना संपूर्णपणे गिळंकृत करत आहे, असे त्यांना वाटले. त्यानंतर प्रियांकाने त्यांना खाली बसवले आणि आपल्या मिठीत घट्ट धरले. त्या क्षणी त्या स्वतःला आवरू शकल्या नाहीत आणि ढसाढसा रडत होत्या. त्यांचे पती राजीव गांधी आता हयात नाहीत, अशी त्यांची खात्री पटली होती. सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले की, त्यावेळी त्यांचे दुःख इतके तीव्र होते की, राजीव गांधींशिवाय जगण्यात त्यांना काही अर्थ दिसत नव्हता. त्यांनी लिहिले, “मला मरायचे होते. मला त्यांच्याशिवाय जगायचे नव्हते.”
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply