भिवंडी शहर आणि तालुक्यात आगीच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २२ ठिकाणी लहान-मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच राहनाळ गावाच्या हद्दीतील एका अगरबत्ती कारखान्याला अचानक भीषण आग लागून संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. कारखान्यात अगरबत्ती बनवण्याच्या साहित्याचा मोठा साठा होता.
दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण
आग विझवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून सध्या कुलिंगचं काम सुरू आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
२२ ठिकाणी आग; काही ठिकाणी फटाके, काही ठिकाणी शॉर्टसर्किट
गेल्या २४ तासांत देवजी नगर येथील लाकडाची वखार, भादवड येथील भंगार गोदाम, अंजूरफाटा रेल्वे लाईन परिसरातील झोपडपट्टी, वडपा येथील कंटेनर, कामतघर ओसवाल वाडीतील बॅट कारखाना मंडप डेकोरेशन, नजराणा कंपाउंडमधील कपड्याचं दुकान, गोरी पाडा येथील घर, काप आळीतील सहा दुकानं, समृद्धी अपार्टमेंट परिसरातील लाकूड, कोंबलपाडा येथील मंडप, भिवंडी टॉकीज परिसर, चाविंद्रा डम्पिंग ग्राउंड, नारपोली येथील कचरा, खडक रोड, हरिहर कंपाउंडमधील विद्युत केबल, ओम साई ओम सोसायटी परिसर, वडपा येथील गोदाम, खाणी विंज परिसर, सुतार आळी येथील घर आणि राहनाळ येथील अगरबत्ती कारखाना अशा विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी काही ठिकाणी फटाक्यांमुळे, काही ठिकाणी दिव्यांमुळे तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे भिवंडीतील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ठाणे, मुंबई आणि वसई-विरार परिसरातही आगीच्या अनेक घटना घडल्या असून प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेत संपूर्ण जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. हा प्रतिबंध ९ नोव्हेंबर २०२६ पासून ८ जानेवारी २०२७ पर्यंत लागू राहणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी यासंदर्भात तातडीचे आदेश जारी केले आहेत. मुंबईतही रॉकेट फटाक्यांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू असून महानगरपालिका प्रशासनाकडून लवकरच अधिकृत परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply