अमेरिकेनं इराणवर अनेक आर्थिक निर्बंध लादले असून, इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या कंपन्या आणि देशांनाही इशारा दिला होता. मात्र एका लीक झालेल्या पत्रातून समोर आलं आहे की, इराणनं या निर्बंधांना बगल देत चीनसोबत गुप्त तेल व्यापाराचं जाळं उभारलं आहे. या पत्रामुळे इराण आणि चीनमधील गुप्त भागीदारी उघड झाली असून, चीनमधील महत्त्वाची बंदरं आणि तेल साठ्यांवर इराणचं नियंत्रण असल्याचा उल्लेख त्यात आहे.
पत्रातून काय उघड झालं?
सूत्रांच्या माहितीनुसार, इराणचे तेलमंत्री हाविद बॉवर्ड यांनी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी सचिव अली शामखानी यांना हे पत्र लिहिलं होतं. राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन यांच्या कार्यकाळात चीनसोबत गुप्त ठिकाणी हे जाळं कसं तयार करण्यात आलं, याचा उल्लेख पत्रात आहे. चीनमध्ये प्रमुख तीन ठिकाणी इराणचं नियंत्रण असल्याचं पत्रात म्हटलं आहे. यामध्ये निंगबो झोवुशन मुक्त व्यापार क्षेत्र, शांडोंग प्रांत आणि डालीयान, हुईझो, डॉयिंग, वेहिफांग अशा सात ठिकाणी तेल वितरण आणि साठ्यांचा समावेश आहे. इराण चीनला तेल देतो आणि त्याच्या बदल्यात मिळालेल्या रकमेतून चीनमधून वस्तू मागवतो. त्यामुळे इराण आणि चीनमधील कंपन्यांना थेट आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहार करण्याची गरज पडत नाही.
चीन इराणकडून ८० टक्के तेल घेतो
२०२५ मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार, इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीपैकी ८० टक्के तेल एकट्या चीननं खरेदी केलं होतं. चीन दररोज सुमारे १४ लाख बॅरल तेल इराणकडून घेतो आणि चीन हा इराणचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. इराणकडून तेल घेण्यावर अमेरिकेनं निर्बंध घातले होते आणि त्यावेळी भारतालाही सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या पत्रातून चीनमधील गुप्त तेल व्यापाराचं जाळं समोर आलं आहे. हे पत्र अधिकृत आहे का, याबाबत स्पष्टता नसल्याचंही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply