धाराशिव जिल्ह्यातील येडशी गावात एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत कुटुंबातील फक्त एक मुलगा वाचला आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. दोघांमधील संवादाची सुमारे तीस सेकंदांची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवच्या नगरपालिकेसाठी अद्ययावत अग्निशमन गाड्या देण्याची मागणी शिंदे यांच्याकडे केली. यावर नगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यास शिंदे यांनी सांगितले आणि मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
## मदतीचे आश्वासन
फोनवर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी येडशी गावात किराणा दुकानाला आग लागून सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते. कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही काही मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली. यावर शिंदे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि लगेच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करतो, असेही सांगितले.
## आग कशामुळे लागली?
या आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून फक्त एक मुलगा वाचला आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास आता तपास पथकाकडून सुरू आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनासाठी लावलेल्या पणतीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. तपास यंत्रणांकडून घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply