येवला शहरातील अंबिया शहा कॉलनी परिसरात भंगार गुदामाला लागलेल्या भीषण आगीत परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्त परिसराची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.
नुकसानग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन देत त्यांनी तातडीने अन्नधान्याची मदत दिली जाईल, तसेच यापुढे आर्थिक मदतही मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आजूबाजूच्या नुकसानग्रस्त कुटुंबांना अन्नधान्याची मदत उपलब्ध करून देण्यात आली असून गरजेनुसार पुढील मदतही दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नागरी वस्त्यांतील भंगार दुकाने शहराबाहेर हलवावीत
अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी नागरी वस्त्यांतील भंगार गुदामे आणि दुकाने शहराबाहेर स्थलांतरित करण्याची कार्यवाही प्रशासनाने गांभीर्याने करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील वाढती लोकसंख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना अडथळे येऊ नयेत, यासाठी रस्त्यांवरील अतिक्रमणे, अडथळा ठरणारी दुकाने आणि अनधिकृत बांधकामे हटवावीत, असे त्यांनी म्हटले.
हॉकर झोन आणि नियोजनबद्ध कार्यवाहीची मागणी
छोटे व्यावसायिक आणि हातगाडीधारकांचा विचार करून पालिकेने स्वतंत्र हॉकर झोन निर्माण करावेत. अतिक्रमण हटविताना व्यावसायिकांचे सहकार्य घेऊन नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. दुर्घटनेनंतर उपाययोजना करण्याऐवजी भविष्यात अशा घटनाच घडू नयेत, यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे आणि पालिकेने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या समन्वयातून कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्येष्ठ नेते संभाजी पवार, दत्ता निकम, दीपक लोणारी, जावेद लखपती, अमजद शेख, गोटू मांजरे, वकील शेख, एजाज शेख, निसार शेख, गुड्डू जावळे, मलिक शेख, सोहेल मोमिन, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply