कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत नंदुरबारच्या रुबी घोडीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नंदुरबारच्या समर्थ राजपूत याने टेंट पेगिंग खुल्या गटात सहा पेग उचलून प्रथम क्रमांक मिळवला असून, या यशामुळे नंदुरबारचे नाव राज्यभरात उंचावले आहे.
समर्थ हा नंदुरबार येथील एम. एन. हॉर्स रायडिंग ॲकॅडमीमध्ये गेली दोन वर्षे सातत्याने घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत आहे. मागील वर्षी त्याने सुरत, सारंगखेडा आणि पुणे येथील स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली होती. या वर्षी नॅशनल सिलेक्शनमध्येही त्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या यशासाठी त्याला ॲकॅडमीचे ट्रेनर कृष्णा मराठे, आदित्य पवार आणि मोहित बच्छाव यांचे मार्गदर्शन लाभले. कृष्णा मराठे यांच्या मेहनतीतून तयार झालेल्या रुबी घोडीचेही या यशात मोलाचे योगदान आहे. राज्यभरातून आलेल्या सर्व रायडर्सनी रुबी आणि समर्थ यांचे कौतुक केले. या यशामागे डॉ. विक्रांत मोरे आणि ॲड. राऊबाबा मोरे यांचे सहकार्य लाभले. डॉ. विक्रांत मोरे यांनी समर्थ आणि कृष्णा मराठे यांच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
परीक्षकांकडूनही कौतुक
स्पर्धेत परीक्षक म्हणून कर्नल सरप्रतापसिंग आणि महाराष्ट्र राज्य एक्वेस्ट्रिन असोसिएशनचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे यांनी रायडरचे कौतुक केले. समर्थच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply