रायगड जिल्ह्यातील मुरूडच्या किनारपट्टीवर हिवाळ्यातील परदेशी पाहुण्यांची चाहूल लागली आहे. दरवर्षी या हंगामात दाखल होणाऱ्या सीगल पक्ष्यांचे थवे आगरदांडा, राजपुरी आणि मुरूड किनाऱ्यावर पोहोचले आहेत. शुभ्र पिसे, लालसर चोच आणि लयबद्ध हालचालींमुळे हे पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असून, त्यांच्या उपस्थितीमुळे समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. यंदा त्यांच्या आगमनाला थोडा विलंब झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागली.
आगरदांडा समुद्रकिनाऱ्यासह एकदरा पुलापासून नबाब पॅलेसपर्यंतच्या सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर सकाळी आणि संध्याकाळी सीगल पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. समुद्राच्या लाटांवर विहार करणे, आकाशात गिरक्या घेणे आणि छोटे मासे व खेकडे पकडण्यासाठी झेपावणे अशा त्यांच्या सहजसुंदर हालचाली पर्यटकांना आकर्षित करतात. ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान हे पक्षी किनारपट्टीवर मुक्काम करतात. थंडीच्या काळात खाद्य आणि अनुकूल अधिवासाच्या शोधात ते स्थलांतर करतात.
नाशिक येथील लक्ष्मण नारायण झाल्टे हे दरवर्षी कुटुंबासह मुरूड समुद्रकिनाऱ्यावर सीगल पक्ष्यांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आवर्जून येतात. मुलांना या पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची संधी मिळावी, यासाठीही अनेक पर्यटक किनाऱ्यावर गर्दी करतात.
स्थलांतराचे तीन प्रमुख मार्ग
ग्रीन वर्क्स ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. निखिल भोपाळे यांच्या माहितीनुसार, मध्य आशियाई, पूर्व आशियाई-ऑस्ट्रेलियन आणि पश्चिम आशियाई-पूर्व आफ्रिकन असे स्थलांतराचे तीन प्रमुख मार्ग आहेत. यंदा कोकण किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचे आगमन नेहमीपेक्षा कमी असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. त्यांचे आगमन उशिरा होत आहे की त्यांची संख्या घटली आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply