दिवाळीचा मुहूर्त साधत नवीन वाहन घरी घेऊन जाण्यासाठी पिंपरी शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. नवीन वाहनांची चौकशी करणे, विविध मॉडेल्सची माहिती घेणे, किंमत आणि वैशिष्ट्यांची तुलना करणे, तसेच वाहनांचे बुकिंग करण्यासाठी ग्राहक शोरूममध्ये येत आहेत.
पाडव्याच्या मुहूर्तावर दरवर्षी हजारो वाहनांची नोंद
दिवाळीला सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी वाहन आणि वस्तू खरेदी केली जाते. मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी शोरूममध्ये रेलचेल असते. दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर सरासरी पाच ते सहा हजार वाहनांची नोंद होते. यंदाही दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवीन वाहन खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक ग्राहकांनी काही दिवसांपूर्वीच वाहनांचे बुकिंग केले आहे, तर काही जण दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये प्रत्यक्ष भेट देत आहेत.
दुचाकी लगेच, काही चारचाकींना प्रतीक्षा
दुचाकी वाहनांना ग्राहकांकडून चांगली मागणी असून, बहुतांश कंपन्यांची विविध मॉडेल्सची वाहने शोरूममध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना बुकिंगनंतर लगेच वाहनांचा ताबा दिला जात आहे. मात्र दुसरीकडे, चारचाकी वाहनांच्या काही लोकप्रिय मॉडेलसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने काही वाहनांसाठी एक ते तीन महिन्यांपर्यंत वेटिंग आहे. काही वाहनांना तर तीन ते सहा महिन्यांचे वेटिंग असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावरच वाहन मिळावे, अशी अपेक्षा असलेल्या ग्राहकांना काही मॉडेलच्या बाबतीत प्रतीक्षा करावी लागत आहे.
सवलती, फायनान्स आणि एक्स्चेंज सुविधा
वाहन कंपन्यांकडून दिवाळीनिमित्त आकर्षक सवलती, विशेष ऑफर्स, फायनान्स योजना आणि एक्स्चेंज सुविधाही दिल्या जात आहेत. जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदी करण्याकडेही काही ग्राहकांचा कल आहे. वाहनांचे मायलेज, किंमत, इंजिन क्षमता, सुरक्षा सुविधा आणि देखभाल खर्च या बाबींचा विचार करून ग्राहक खरेदीचा निर्णय घेत आहेत. शोरूम चालकांच्या मते, चौकशी आणि माहितीसाठी ग्राहक येत आहेत आणि वाहन विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply