दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, फराळ आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण! यंदाची दिवाळी आणखी खास करण्यासाठी ‘मोहिनी’ मालिकेतील लोकप्रिय कलाकार समीर परांजपे आणि अनघा ठाकूर यांनी त्यांच्या दिवाळीच्या आठवणी, आवडीनिवडी, सेटवरची धमाल आणि मालिकेतील खास गोष्टी सांगितल्या आहेत.
लग्नानंतरची पहिली दिवाळी
समीरने सांगितले की, आरकेसाठी यंदाची दिवाळी नक्कीच खास असणार आहे. कारण मोहिनी घरात आली आहे आणि ती आल्यापासून कारखानीस कुटुंबात खऱ्या अर्थाने सण साजरे होत आहेत. आरके याआधीही दिवाळी साजरी करत होताच, पण त्याच्यासाठी ती एक इव्हेंट असायची. सगळ्या गोष्टी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे दिलेल्या असायच्या आणि त्या पद्धतीने सगळे अरेंज केले जायचे.
मात्र आता मोहिनी घरात आल्यामुळे तिचा वेगळा अट्टाहास आहे की, सण साजरा करायचा आहे, सण उरकायचा नाही. सण साजरा करायचा म्हटल्यावर त्यात आपलेपणा पाहिजे आणि सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांचा सहभाग हवा, असा तिचा आग्रह आहे. आरके त्यासाठी अजिबात तयार नाही. पण मोहिनी साम, दाम, दंड, भेद सगळे वापरून ते करून घेणार, त्यामुळे आरकेला मनवण्यासाठी ती काय करते, हे बघणे रंजक असणार आहे.
अनघाने सांगितले की, मोहिनीसाठी हा दिवाळी सण खास आहे, कारण तिची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे. आतापर्यंत मोहिनीने चाळीत आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. आता एका सुपरस्टारच्या घरात दिवाळी साजरी करताना मोहिनी स्वतःचा टच देत आहे. घरातील वरवरची सजावट आणि कृत्रिमपणा यांना आपलेपणाची झालर लावण्याचा प्रयत्न ती करत आहे. सगळे राग-रुसवे, हेवेदावे आणि भांडणे विसरून ती सगळे प्रेमाने करत आहे. तिचे म्हणणे आहे की, सगळे कंत्राटदाराकडून करण्यापेक्षा मलाच सगळे करायचे आहे — सासरी फराळ बनवायचा आहे, रांगोळी काढायची आहे. ही धावपळ सुरू आहे आणि त्यात तिचा वेगळाच आनंद दडला आहे.
दिवाळी विशेष भागांत काय पाहायला मिळणार
दिवाळीच्या निमित्ताने मालिकेच्या कथानकात भावनिक आणि रंजक वळणे पाहायला मिळणार आहेत. दिवाळी विशेष भागांमध्ये आरके आणि मोहिनीचा दिवाळी पहाटचा पॉडकास्ट बघायला मिळणार आहे. तो थोडा हटके आणि खूप मनोरंजक असणार आहे, कारण त्यात मोहिनी आणि आरके या दोन्ही पात्रांचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरची सगळी धमाल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यासोबतच प्रतापरावची टांगती तलवार आहेच.
समीरने सांगितले की, मालिकेत दिवाळीच्या निमित्ताने एक वळण नक्कीच आहे. प्रतापरावाला जेलमधून बाहेर काढायचे आहे आणि त्यासाठी जो संघर्ष उभा राहिला आहे, तो ऐन दिवाळीच्या तोंडावर आरके आणि मोहिनीमध्ये सुरू आहे. हा संघर्ष दिवाळीच्या निमित्ताने शांत होणार का, की अजून वाढणार, हे बघणे रंजक ठरणार आहे. शिवाय एक भावनिक वळणही आहे, जे गणपतीच्या वेळेलाही आले होते आणि तेच दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा डोके वर काढू शकते.
सेटवर दिवाळीचा माहोल कसा असतो, याबद्दल अनघा म्हणाली की, ती पहिल्यांदाच हा अनुभव घेत आहे आणि खूप धमाल मजा येत आहे. अख्खे आरके हाऊस सजवलेले आहे. दिवाळीच्या भागांसाठी नवीन नवीन कपडे येत आहेत. मोहिनी म्हणून तिने फराळ बनवला, कंदील बनवला आणि रांगोळी काढली. वाहिनीची दिवाळी पार्टीही झाली, ज्यात सगळी जवळची माणसे भेटली. फटाकेही फोडले गेले आणि सगळ्यांमध्ये कमाल आणि आनंदी वातावरण आहे.
समीरने सांगितले की, मालिकेच्या सेटवर दिवाळीचा माहोल कमालीचा असतो. कारण दिवाळीच्या आधीच मालिकेमध्ये दिवाळी साजरी केली जाते. प्रकाशाचा सण असल्याने सकारात्मकता घेऊन येणारा हा सण आहे. पाच-सात दिवस तो सेटअप लागलेला असतो — आकाशकंदील, पणत्या आणि त्यामुळे वातावरण खूप सुंदर होते. प्रत्येक फ्रेम सुंदर दिसते.
दोघांच्याही आवडत्या दिवाळीच्या पदार्थाबद्दल अनघा म्हणाली की, तिचा सर्वात आवडता फराळातला पदार्थ तिखट शंकरपाळी आणि चकली आहे. समीरने सांगितले की, त्याचा आवडता पदार्थ कोणतीही शंका न आणता चकली आहे. डायट आणि बाकी सगळ्या गोष्टी विसरून चकली खाण्याचा आनंद वेगळाच असतो, असे तो म्हणाला.
पहिला पाडवा आणि दिवाळी सण याबद्दल अनघा म्हणाली की, मोहिनी आणि आरकेचे नाते अजून तितकेसे खुललेले नाही. प्रेमाच्या बाबतीत दोघेही अजून ओपन झालेले नाहीत. प्रतापरावला जेलमधून बाहेर काढायचे की नाही, यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुळे पहिला पाडवा तसा काही विशेष नाही. पण पॉडकास्टमध्ये आरके आणि मोहिनीची नोकझोक आणि रोमान्स नक्कीच बघायला मिळेल. समीरनेही सांगितले की, दोघेही अजून टॉम अँड जेरीसारखे भांडतात, पण पाडवा वेगळा आणि धमाल असा बघायला मिळू शकतो.
इच्छांबद्दल बोलताना समीर म्हणाला की, आरकेला त्याच्या आईवर आलेले संकट दूर व्हावे, अशी इच्छा असेल. समीर म्हणून त्याने महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती आणि संकटात असलेल्या शेतकरी बांधवांसाठी प्रार्थना केली. अनघा म्हणाली की, मोहिनीची माफक इच्छा आहे की तिची जवळची माणसे — माहेरची, सासरची आणि तिचा नवरा — नेहमी एकत्र आणि आनंदी राहावीत. प्रतापरावाला जेलमधून बाहेर काढू नये, हे तिचे म्हणणे सगळ्यांना पटावे आणि आरकेने हे ७ महिन्यांचे लग्न कायमचे करावे, अशीही तिची इच्छा आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply