सध्या देशात विविध मागण्यांसाठी आंदोलने होत आहेत. रस्त्यावर उतरून मार्ग अडविले जात आहेत आणि धरणे दिली जात आहेत. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनकर्त्याकडे मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, काही प्रश्न व्यक्तिनिष्ठ नसून व्यवस्थेत आहेत. शक्तीचा उपयोग सकारात्मक पद्धतीने करणे आवश्यक आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत, तेथे आपल्या क्षमतेनुसार सकारात्मक कार्य करू शकतो आणि त्या प्रयत्नामुळे व्यवस्थाबदलाकडे एक पाऊल पडते. परभणी जिल्ह्यातील काही उदाहरणे हेच सांगतात.
प्रवेश बंद करावा लागलेली जिल्हा परिषद शाळा
जिल्हा परिषद शाळा म्हटले की शिक्षकवर्ग निरुत्साही, दर्जेदार शिक्षणाचा अभाव आणि त्यामुळे पटसंख्या कमी असा समज रूढ आहे. परंतु, हा समज मोडीत काढणारी शाळा परभणी जिल्ह्यातील मानवत शहरात आहे. पीएमश्री केंद्रीय प्राथमिक शाळेची पटसंख्या १५०० आहे. वर्ग पहिली ते आठवीपर्यंतच आहेत. आता प्रवेश देण्यासाठी वर्गात जागाच शिल्लक नाही, म्हणून प्रवेश बंद करावा लागतो.
पटसंख्या दीड हजारावर असणे आणि जागा शिल्लक नसल्यामुळे प्रवेश बंद करावा लागणे, हे खासगी शाळेबाबतचे वर्णन जेव्हा जिल्हा परिषद शाळेला लागू होते, तेव्हा त्यापाठीमागे निश्चितच प्रयत्नांचे सातत्य असते. ज्या शहरात पूर्वीपासून अनेक शाळा कार्यरत आहेत आणि पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे ओढा आहे, त्या शहरात जिल्हा परिषदेची शाळा अशा पद्धतीने उभी करणे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाच लागते. या प्रयत्नाचा प्रारंभ शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या माध्यमातून झाला आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर येथील शिक्षकवर्गाने मार्गक्रमण केले. प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याची आदर्श व्यवस्था निर्माण केली. यासाठी त्यांना कुठलाही वेगळा पगार किंवा पुरस्कार देण्यात आला नाही. या शिक्षकांनी व्यवस्थेविषयी कुठलीही तक्रार केली नाही. फक्त आपल्या क्षमता आणि शक्तीचा उपयोग सकारात्मक बदलासाठी केला.
या शाळेत ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. शहरातील सोयी-सुविधा मिळणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या तुलनेत ते कुठेही कमी नसतात. फक्त त्यांना आवश्यक असते शिक्षकरूपी मूर्तिकारांची. मानवत येथील कार्यपद्धतीचा गांभीर्याने विचार राज्यातील प्रत्येक शाळेने करायला हवा.
स्नेहवन आणि पाण्यासाठीचे प्रयत्न
मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील अशोक देशमाने हे संगणक अभियंता असून पुण्यात एका आयटी कंपनीत नोकरीस होते. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असल्यामुळे चांगले वेतन आणि एकूणच सुरक्षित भविष्य होते. परंतु, देशमाने यांचा पिंड समाजसेवेचा होता. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. अशा कुटुंबातील मुलांचे भविष्य अतिशय अंधकारमय असल्याचे दिसत होते. कर्जाचा डोंगर आणि अल्प उत्पन्न असल्यामुळे ही मुले शिक्षण सोडून रोजगाराकडे वळतात. ही परिस्थिती लक्षात येताच अशोक देशमाने यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या पाल्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या राहत्या घरात त्यांनी मुले सांभाळण्यास सुरुवात केली. कामाचा व्याप वाढला आणि अनेक अडचणी येत होत्या. शेवटी त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्याचे धाडसी पाऊल उचलले. अनेक हातांनी सहकार्य केले आणि आज आळंदीजवळील स्नेहवन प्रकल्पात शंभरावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्नेहवन प्रकल्पाने या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारात जाण्यापासून वाचवले आहे.
अंबाजोगाई येथील प्रसाद चिक्षे हे आणखी एक व्यक्तिमत्त्व आहे. आयआयटीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा कुठलीही नोकरी न करता पूर्णवेळ सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतो, तेव्हा त्यामागे मोठा विचार असतो. विद्यार्थीदशेत असताना ज्ञानप्रबोधिनी संस्थेशी त्यांचा संपर्क आला आणि व्यक्तिगत संपत्ती निर्माण करण्यापेक्षा आयुष्यभर समाजहिताचे कार्य करण्याचे त्यांनी निश्चित केले. अंबाजोगाई तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष होते आणि पाणीपातळी खोलवर गेली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रसाद चिक्षे यांनी काम सुरू केले. तालुक्यातील अनेक गावांत ग्रामसभा घेतल्या आणि नागरिकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. सर्वात उल्लेखनीय कार्य राडी तांडा येथे झाले. गावातील नागरिकांनी अतिशय मेहनतीने काम केले. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी खड्डे करण्यात आले. या कामात गावातील युवकांचे व्यसनसुद्धा सुटले. या मेहनतीचे फळ गावकऱ्यांना मिळाले आणि पाणीपातळीत वाढ झालेली दिसून आली. पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत या गावाला राज्यातून तिसरे पारितोषिक मिळाले.
साधू-संतांनी सांगितलेच आहे की, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.’ व्यवस्थेत चुका आहेत म्हणून तक्रार करत बसण्यापेक्षा आपल्या क्षमतेप्रमाणे सकारात्मक कार्य करणारे हात आपल्या आजूबाजूलाही आहेत. त्यांचा आदर्श स्वीकारणे आणि येणाऱ्या पिढीसमोर तो सांगणे, हेच आपले काम आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply