वर्षभरात पावसाळा जसा ठरलेल्या वेळी येतो, तसंच प्रत्येकाच्या आयुष्यात वय वाढणंही अटळ असतं. जन्म आणि मृत्यू कुणालाही चुकत नाहीत. वय वाढलं की शरीर आणि मनाच्या आरोग्याच्या अडचणी सुरू होतात. आजारपण, एकटेपणा, नैराश्य आणि दुबळेपणा हे वृद्धापकाळाचे सोबती बनतात. औषधं आणि दवाखान्याच्या फेऱ्या वाढतात. पण या अडचणींवर धैर्याने मात करता येते, त्यासाठी जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती हवी.
छंद आणि सहवास हाच आधार
आवडीच्या गोष्टी करण्यात खरं सुख असतं, हे आधी लक्षात घ्यायला हवं. योगाभ्यास, हास्य मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ यांसारख्या उपक्रमांत सहभागी झाल्यानं मनाचं स्थैर्य आणि आरोग्य दोन्ही मिळतं. समवयस्कांच्या सहवासात वयाशी निगडित प्रश्न हलके होतात आणि ज्येष्ठत्व खुलतं, फुलतं. वाढत्या वयाबरोबर अनुभवसंपन्न होणं, इतरांना हवेहवेसे वाटणं हीच ज्येष्ठत्वाची खरी लक्षणं आहेत. संध्याकाळचा सूर्य मावळताना आपली सोनेरी छटा मागे ठेवून जातो; तसंच आपलं अस्तित्व इतरांच्या मनात निर्माण करून कायम उरणं म्हणजे ज्येष्ठत्व.
उत्तरार्ध रंगीत करण्याची कला
आयुष्य खळखळणाऱ्या नदीसारखं पुढे वाहत राहतं. पूर्वार्ध दमछाकीत जातो, मधला काळ स्वतःला सिद्ध करण्यात आणि मुलांवर संस्कार, अर्थार्जन व भविष्याची तरतूद करण्यात जातो. या धावपळीत तारुण्य कधी निघून जातं, कळतही नाही. बालपण, किशोरावस्था, युवावस्था, प्रौढत्व आणि शेवटी ज्येष्ठत्व या प्रत्येक टप्प्यात स्वतःचं सौंदर्य असतं. उत्तरार्धात आपल्यातलं लहान मूल जपता आलं पाहिजे. लहानसहान गोष्टींतलं सौंदर्य निरागसपणे टिपता आलं पाहिजे. राहून गेलेली पुस्तकं वाचणं, आवडीची गाणी ऐकणं, नातवंडांशी मैत्री करणं, छंद पुन्हा जिवंत करणं यातून वयाचं जडत्व हलकं करता येतं. वृद्धत्व हा वयाचा आकडा आणि प्रकृतीशी निगडित असतो, तर ज्येष्ठत्व अनुभव, सहजता आणि योग्य मार्गदर्शन करण्याच्या क्षमतेशी जोडलेलं असतं. त्यामुळे वृद्धत्वाकडे न पाहता ज्येष्ठत्वाची उबदार शाल पांघरून आनंदात राहणं हाच खरा शहाणपणा आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply