बँकेत पैसे सुरक्षित ठेवून त्यावर चांगला परतावा मिळवायचा असेल, तर फिक्स्ड डिपॉझिट हा बऱ्याच जणांचा आवडता पर्याय आहे. अशातच खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे एफडीमध्ये पैसे गुंतवणाऱ्या ग्राहकांना आता जास्त व्याज मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा जास्त व्याजदर मिळेल. तर 10 लाख रुपयांची एफडी केल्यावर 5 वर्षांनंतर किती पैसे मिळतील, हे समजून घ्यायला हवे.
4 नोव्हेंबरपासून नवे व्याजदर लागू
एचडीएफसी बँकेने 3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या काही एफडीवरच्या व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. हे नवीन दर 4 नोव्हेंबर 2026 पासून लागू झाले आहेत. बँकेने 61 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीवरील व्याजदर 4.25 टक्क्यांवरून 4.75 टक्के केला आहे. तर 6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांपर्यंतच्या ठेवींवर 5.65 टक्के व्याज मिळेल. 9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी वेळेच्या एफडीवर 5.90 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे.
1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.25 टक्के, तर 15 ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 6.35 टक्के व्याज मिळेल. तसेच 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षांपर्यंतच्या काही एफडीवर 6.60 टक्के व्याजदर लागू असेल.
ज्येष्ठ नागरिकांना 7.20 टक्क्यांपर्यंत व्याज
एचडीएफसी बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज दिले जात आहे. 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.20 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. समजा, 60 वर्षांखालच्या एखाद्या व्यक्तीने 10 लाख रुपयांची एफडी 5 वर्षांसाठी केली, तर 6.60 टक्के व्याजदरानुसार मुदतपूर्तीनंतर त्याला अंदाजे 13,87,227 रुपये मिळतील. म्हणजेच 3,87,227 रुपयांचे व्याज मिळेल.
दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांनी 10 लाख रुपयांची एफडी 5 वर्षांसाठी केल्यास 7.20 टक्के व्याजदरानुसार मुदतपूर्तीनंतर अंदाजे 14,28,748 रुपये मिळतील. यात 4,28,748 रुपये व्याजाचे असेल. त्यामुळे एफडी करण्यापूर्वी बँकेचे लागू व्याजदर, मुदत आणि व्याज मोजण्याची पद्धत तपासणे महत्त्वाचे आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply