महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात गेल्या एका वर्षात पोस्ट ग्रॅजुएट मेडिकलच्या १,०६६ नवीन जागा वाढल्या आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील ७२० जागांचाही समावेश आहे. या वाढीमुळे कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्राने देशात थेट दुसरे स्थान पटकावले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रात पदव्युत्तर ब्रॉड स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या एकूण ७,६१५ जागा उपलब्ध झाल्या आहेत. गतवर्षीच्या ६,५४९ जागांच्या तुलनेत यंदा १,०६६ जागांची म्हणजेच १६.३ टक्क्यांची निव्वळ वाढ झाली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी विस्तारल्या आहेत.
वाढलेली पदव्युत्तर प्रवेशक्षमता ही उद्याच्या सक्षम आरोग्यव्यवस्थेचा पाया असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. महाराष्ट्रात अधिक तज्ज्ञ डॉक्टर घडतील, वैद्यकीय संशोधनाला चालना मिळेल आणि शासकीय रुग्णालयांची उपचारक्षमता वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
देशातील आघाडीची राज्ये
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अद्ययावत केलेल्या आसन मॅट्रिक्सनुसार कर्नाटक ८,८६२ जागांसह देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर तमिळनाडू ६,६७८, उत्तर प्रदेश ६,६७५, तेलंगणा ४,४०३ आणि आंध्र प्रदेश ४,३०९ जागांसह पुढील क्रमांकावर आहेत. राजस्थानमध्ये ३,९५०, गुजरातमध्ये ३,८०१, मध्य प्रदेशात ३,२७७, तर पश्चिम बंगालमध्ये २,३५४ जागा आहेत.
कोणत्या महाविद्यालयात किती जागा वाढल्या
राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमडी आणि एमएस पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये २९ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एकूण ७२० जागांची निव्वळ वाढ झाली आहे. महाविद्यालयनिहाय आकडेवारीनुसार उस्मानाबाद येथे सर्वाधिक ७७ जागांची वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथे ७३, सातारा येथे ६४, धुळे येथे ४४ आणि अंबरनाथ येथे ४० जागांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
कोल्हापूर आणि अंबाजोगाई येथे प्रत्येकी ३९, लातूर येथे ३८, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे ३७, तर सोलापूर आणि जालना येथे प्रत्येकी ३५ जागांची वाढ झाली आहे. हिंगोली येथे ३२, एल. टी. मार्ग, मुंबई येथे ३०, अलिबाग येथे २७, बारामती येथे २२ आणि नांदेड येथे १९ जागा वाढल्या आहेत. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि यवतमाळ येथे प्रत्येकी १७ जागांची वाढ झाली आहे. नंदुरबार येथे सात, गोंदिया येथे सहा, नाशिक येथे तीन आणि चंद्रपूर येथे दोन जागांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
विविध वैद्यकीय शाखांमध्येही पदव्युत्तर प्रवेशक्षमता वाढली आहे. यामध्ये भूलशास्त्र, शरीररचनाशास्त्र, जैवरसायनशास्त्र, समुदाय वैद्यक, न्यायवैद्यकशास्त्र, सर्वसाधारण औषधशास्त्र, बालरोगशास्त्र, विकृतिशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, मानसोपचारशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, रेडिओडायग्नोसिस, सर्वसाधारण शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, नेत्ररोगशास्त्र आणि अस्थिरोगशास्त्र या शाखांचा समावेश आहे. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरीरक्रियाशास्त्राच्या जागा तीनवरून २१, तर जैवरसायनशास्त्राच्या जागा दोनवरून १७ झाल्या आहेत. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे विकृतिशास्त्राच्या जागा चारवरून १५, औरंगाबाद येथे समुदाय वैद्यकाच्या जागा १२ वरून २२, तर कोल्हापूर येथे भूलशास्त्राच्या जागा चारवरून १४ झाल्या आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply