राज्याचे अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. एफडीएचा कारभार त्यांनी हातात घेतल्यापासून राज्यभरात कारवाया सुरू आहेत. याच काळात मुंढे यांनी पहिल्यांदाच आपल्या मुलांबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुंढे म्हणाले की, मी माझ्या मुलांसोबत नेहमीच चर्चा करतो आणि आमच्यात मनमोकळेपणाने बोलणे होते.
दारूच्या पार्टीत मुलगा जात नाही
मुलाच्या मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या मोठ्या होतात आणि तिथे मद्यप्राशन केले जाते. मात्र अशा पार्ट्यांमध्ये माझा मुलगा कधीच जात नाही, असे मुंढे यांनी सांगितले. ज्या पार्टीत मद्यप्राशन केले जाते, तिथे मी जाणार नाही, अशी मुलाची विचारसरणी स्पष्ट असल्याचे ते म्हणाले. मित्राच्या पार्टीत जायचे की नाही, हा निर्णय मुलगा स्वतः घेतो.
मुलाचा वाढदिवस घरीच साजरा केला जातो किंवा एखाद्या छोट्याशा ठिकाणी जाऊन साजरा केला जातो. वाढदिवसाला आठ ते दहा मित्र येतात आणि सर्वकाही अगदी मोजकेच असते. ज्या मित्राच्या पार्टीत मद्यसेवन होते, तिथे जायचे नाही, हा मुलाचा ठाम निर्णय आहे. मी ड्रिंक करत नाही आणि माझ्या घरी कोणीही ड्रिंक करत नाही, त्यामुळे त्याच्यावर या गोष्टीसाठी पैसे खर्च होत नाहीत, असे मुंढे म्हणाले.
शिक्षणासाठी कितीही खर्च करण्याची तयारी
घरातच कोणी ड्रिंक घेत नाही, म्हणून ते इतरांना देण्याचा प्रश्नच येत नाही, असे मुंढे यांनी सांगितले. मुलांच्या शिक्षणासाठी कितीही पैसे लागू दे, त्याचा काही प्रश्न नाही आणि मी कितीही पैसे शिक्षणावर खर्च करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. माझे मुले भविष्यात किती पैसे कमावतील हे मला माहीत नाही, पण ते स्वतःच्या मेहनतीवर आणि योग्य मार्गाने पैसे कमावतील, याची मला खात्री आहे, असेही ते म्हणाले. यापूर्वीच्या एका मुलाखतीत मुंढे यांनी सांगितले होते की, त्यांच्या सततच्या बदलीचा मुलांवर कायमच परिणाम झाला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply