गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली असून, त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट लिहून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपच्या लोकशाहीविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दुटप्पी धोरणावर टीका केली आहे. निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनेलचे १३ संचालक विजयी झाले, तर भाजपच्या पॅनेलचे १२ संचालक निवडून आले. तरीही निवडणुकीनंतर सरकारने पाच संचालक नेमण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना मतदानाचा अधिकारही देण्यात येणार आहे. यामुळे पाटील यांच्या गटाचे अध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.
## काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी भाजपला अजब पक्ष असे संबोधले आहे. त्यांच्या मते, खालपासून वरपर्यंत सत्तेत असलेला पक्ष लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत असल्याचे चित्र विचित्र आहे. जगात सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा काढत असल्याचे हे एकमेव उदाहरण असावे, असा टोलाही त्यांनी लगावला. लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल, तर गोकुळ प्रकरणात भाजपने सरकारचे पाच संचालक का नेमले, असा सवाल त्यांनी केला. बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून हे संचालक निवडून आले होते, असे त्यांनी नमूद केले.
गोकुळवर सत्ता मिळवता आली नाही म्हणून भाजपने आपली सगळी तत्त्वे बाजूला ठेवली, अशी टीका ठाकरे यांनी केली. सत्तेत असताना ते लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील, असेही ते म्हणाले. त्यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले आणि कायदा-सुव्यवस्था बिघडली, म्हणून दहशतवादापासून देश वाचवण्यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे, म्हणून अर्थव्यवस्था वाचवण्यासाठीही मोर्चे काढतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
## रडीचा डाव बंद करण्याचे आवाहन
भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. कुठल्या का मार्गाने भाजपने जे बहुमत मिळवले, ते सर्व विरोधी पक्षांनी बारा वर्षे सहन केले. आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे, तर भाजपनेही सहन करायला शिकले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे आणि भाजपमध्ये समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. या प्रकरणावर काँग्रेसने न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली आहे. गोकुळ दूध संघाशी सुमारे साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी जोडलेले आहेत, त्यामुळे या वादाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply