भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू ऊस गळीत हंगामात दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ६ नोव्हेंबरअखेर २६ दिवसांत कारखान्याने एकूण २ लाख १ हजार ६४९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, संचालक मंडळाच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे या यशाची नोंद झाली आहे. या कामगिरीमुळे कारखान्याच्या सभासदांसह कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२६ दिवसांत दोन लाख टनांहून अधिक गाळप
६ नोव्हेंबरच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार एका दिवसात ८ हजार ६९३ टन उसाचे गाळप झाले. आतापर्यंत १ लाख ८९ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, आजची साखर रिकव्हरी १०.४३ टक्के तर हंगामातील सरासरी रिकव्हरी ९.६५ टक्के नोंदविण्यात आली आहे. यंदा गळीत हंगामाची सुरुवातही मागील वर्षांच्या तुलनेत लवकर करण्यात आली. योग्य नियोजन, ऊस उत्पादकांना दिलेले प्राधान्य, वेळेवर होणारी बिले आणि कामगारांचे सहकार्य या बाबींमुळे कारखान्याच्या गाळपाला गती मिळाली आहे. कारखान्याच्या मशिनरीची कामे वेळेत व नियोजन पद्धतीने केल्याने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता दररोज आठ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक आहे.
शेतकऱ्यांना वेळेवर पैसे, कामगारांना बोनस
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी जाहीर केलेल्या वजन चोख, पैसे रोख या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ऊस उत्पादकांना त्यांच्या उसाचे योग्य वजन आणि वेळेत पैसे मिळत असल्याने कारखान्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. परिणामी, कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील विविध भागांतील ऊस उत्पादकही आपला ऊस गाळपासाठी छत्रपती कारखान्याला प्राधान्य देत आहेत. चालू हंगामासाठी प्रतिटन ३ हजार ५०१ रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर आणि संचालक मंडळाने घेतला आहे. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतानाही कारखान्याने सभासद, कामगार आणि पुरवठादारांची देणी वेळेत अदा करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. कामगारांना १५ टक्के बोनस देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
वीज निर्मितीतही योगदान; विक्रमाची शक्यता
छत्रपती कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून या हंगामात आतापर्यंत ८४ लाख ५१ हजार ८०० युनिट वीज निर्मिती करण्यात आली असून, यापैकी ५३ लाख ३० हजार युनिट विजेची निर्यात करण्यात आली आहे. गतवर्षीच्या हंगामामध्ये छत्रपती कारखान्याने आजअखेर केवळ २३ हजार ५५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. कारखान्याचा सध्याचा ऊस गाळपाचा वेग लक्षात घेता, छत्रपती कारखाना यावर्षीच्या गळीत हंगामात उच्चांकी ऊस गाळप करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply