मालेगाव शहरात दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. काही नागरिक वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. यावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आयेशानगर पोलिसांसह संयुक्त कारवाई करत रस्त्यावरील नऊ दुचाकी व साहित्य जप्त केले.
जुना आग्रा रोडवरील वाहतूक सुरळीत
शहरात दोन दिवसांपूर्वी किदवाई रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले होते. वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महापालिका आयुक्त भाग्यश्री विसपुते यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी जुना आग्रा रोड, सुपर मार्केट जवळ रस्त्याला लागून उभ्या केलेल्या नऊ दुचाकी, चार लोखंडी स्टूल, होर्डिंग बॅनर व इतर साहित्य जप्त करून आयेशानगर पोलिस ठाण्यात जमा केले. या कारवाईने जुना आग्रा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई
उपायुक्त सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त बाळू धोंडगे, प्रभाग अधिकारी संतोष गायकवाड, अतिक्रमण अधीक्षक प्रवीण पवार, आयेशानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंग बहुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त भाग्यश्री विसपुते यांनी दिला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply