मनी लॉन्ड्रिंगच्या कथित प्रकरणात गुरुवारी हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांना मोठा दिलासा मिळाला. या प्रकरणातील ईडीचा क्लोजर रिपोर्ट विशेष पीएमएलए न्यायालयाने मंजूर केला. कोल्हापूरमधील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित प्रकरणात ईडीने तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला होता आणि हा अहवाल न्यायालयाने स्वीकारला. मूळ प्रकरणच बंद झाल्यामुळे आता मनी लॉन्ड्रिंगचा तपास पुढे सुरू ठेवण्याचे काही कारण नसल्याचे ईडीने म्हटले होते. या निर्णयावर मुश्रीफ यांनी माझी दिवाळी गोड झाली, अशी प्रतिक्रिया दिली.
सरदेंचे ट्विट: निर्णयाला आव्हान देता येईल
मात्र या प्रकरणावर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी एक ट्विट केले असून, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. हसन मुश्रीफ यांच्यावरील १०० कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास बंद झाल्याने विषय संपलेला नाही, असे सरोदे यांनी म्हटले आहे. क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देता येऊ शकते, असा त्यांचा दावा आहे. सामाजिक संवेदनशीलता असलेला कोणताही नागरिक या निर्णयाला कायदेशीर आव्हान देऊ शकतो. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्तेही निर्णयाला आव्हान देऊ शकतात, असे सरोदे यांनी म्हटले आहे.
अनेकजण न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहेत, असेही सरोदे यांनी सांगितले. संपूर्ण निर्णयाचा अभ्यास करून पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत निश्चितता ठरवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सरोदे यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी काय?
२०२३ मध्ये शेतकऱ्यांना साखर कारखान्यात भागधारक करण्याचे आश्वासन देऊन निधी गोळा केल्याचा मुश्रीफ कुटुंबावर आरोप झाला होता. सुमारे ४० हजार शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ही रक्कम मुश्रीफ यांच्या कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता. मात्र आता याच प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply