महिन्याच्या शेवटी पैसे संपतात आणि बचत शून्यावर येते, अशी तक्रार अनेकांची असते. पण सोशल मीडियावर सध्या एका अशा नोकरीची चर्चा रंगली आहे, जिथे पैसे कमावणे सोपे आहे, मात्र ते खर्च करणे हेच मोठे आव्हान आहे. या नोकरीत काम करणाऱ्या तरुणाला चांगला पगार मिळतो, पण मिळालेले पैसे खर्च कसे करायचे, हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे.
कॅनडाच्या उत्तरेकडील दुर्गम भागात नोकरी
इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या एका व्हिडीओमध्ये हा तरुण कॅनडाच्या उत्तरेकडील आर्क्टिक प्रदेशात काम करताना दिसतो. तो एका कंपनीत स्वयंपाकी म्हणून काम करतो आणि त्याला दरमहा पाच हजार कॅनेडियन डॉलर पगार मिळतो. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे तीन लाख ३९ हजार रुपयांच्या घरात जाते. ऐकायला ही नोकरी खूपच आकर्षक वाटते; मात्र या तरुणाची अडचण वेगळीच आहे.
जेवण-राहणी मोफत, पण खर्चाला वावच नाही
जेवण आणि राहण्याची व्यवस्था कंपनीकडूनच मोफत केली जाते. त्यामुळे रोजच्या गरजांवर पैसे खर्च करावे लागत नाहीत. सुट्टीच्या दिवशी बाहेर जाऊन खरेदी करण्याची सोयही तिथे नाही. एखादी वस्तू ऑनलाइन मागवायची म्हटले तरी दुर्गम भाग असल्यामुळे डिलिव्हरी पोहोचेलच याची खात्री नसते. त्यामुळे दरमहा पगार खात्यात जमा होतो, पण तो खर्च करण्यासाठी फारसे पर्यायच उपलब्ध नाहीत.
आर्क्टिकचे कडाक्याचे हवामान
आर्क्टिक प्रदेश हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला अत्यंत थंड आणि दुर्गम भाग आहे. तिथल्या अनेक भागात वर्षातील बहुतांश काळ बर्फ असतो. उन्हाळ्यातही तापमान साधारण शून्य ते उणे दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान असू शकते, तर हिवाळ्यात ते उणे पन्नास अंशांच्या खालीही घसरते. कडाक्याची थंडी आणि बर्फाच्छादित जमिनीमुळे तिथे लोकवस्ती अत्यंत विरळ आहे. मॉल किंवा मोठी बाजारपेठ तिथे नसल्याने चांगला पगार मिळूनही पैसे खर्च करण्याचे पर्याय मर्यादित राहतात. बचत करण्यासाठी धडपडणाऱ्या अनेकांसाठी ही समस्या अनोखी आणि आश्चर्यकारक वाटू शकते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply