थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या पुणे कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीग २०२६ स्पर्धेच्या साखळी फेरीत कॉग्निझंट आणि यूबीएस पुणे या संघांनी विजयांची नोंद केली. कॉग्निझंटने स्पर्धेतील आपला सलग चौथा विजय साकारला, तर यूबीएस पुणे संघाने तिसरा विजय मिळवत आगेकूच कायम ठेवली.
ओंकार गायकवाडच्या गोलंदाजीवर कॉग्निझंट विजयी
साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केपीआयटी संघाने २० षटकांत ९ बाद १४१ धावा उभारल्या. शुभम झापडेकर याने ३६ चेंडूंत ३७ धावा केल्या, तर सोमेश मर्दाने याने २९ आणि मंगेश पाटील याने २७ धावांचे योगदान दिले. कॉग्निझंटकडून ओंकार गायकवाड याने २४ धावांत ४ बळी टिपले, तर आनंद कोंडा याने २९ धावांत २ गडी बाद केले.
१४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कॉग्निझंटने १९.३ षटकांत ६ बाद १४३ धावा करत सामना ४ गडी राखून जिंकला. वामसी के. याने २६ चेंडूंत ४० धावांची, तर मानस गोकवी याने २२ चेंडूंत ३२ धावांची आक्रमक खेळी केली. केपीआयटीकडून शुभम सोनावणे आणि आलोक नागराज यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. भेदक गोलंदाजी करणारा ओंकार गायकवाड सामन्याचा मानकरी ठरला.
प्रवीण सिंगची अष्टपैलू चमक, यूबीएस पुणे विजयी
दुसऱ्या लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या एसएसअँडसी ऍडव्हेंट संघाला २० षटकांत ७ बाद १३२ धावांपर्यंतच मजल मारता आली. तारिक अन्सारी याने २५ चेंडूंत ३८ धावा, तर मनीष सुपल याने २६ चेंडूंत ३३ धावा केल्या. यूबीएस पुणेकडून राजेश वर्मा याने २२ धावांत ३ बळी टिपले, तर प्रवीण सिंग आणि अंकित जैन यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.
१३३ धावांचे लक्ष्य यूबीएस पुणे संघाने १७.२ षटकांत केवळ २ गडी गमावून सहज पूर्ण केले. प्रवीण सिंग याने ३१ चेंडूंत नाबाद ३७ धावांची संयमी खेळी केली, तर अंकित जैन याने ३३ चेंडूंत ३३ धावांची साथ दिली. अष्टपैलू कामगिरी करणारा प्रवीण सिंग सामनावीर ठरला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply