जळगाव जिल्ह्यात अवैध दारूची निर्मिती, विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑक्टोबर महिन्यात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तब्बल २२२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १८७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत ४४ लाख ८१ हजार ८७३ रुपये इतकी आहे. बेकायदा दारू वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली आठ वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
सणासुदीच्या काळात बेकायदा दारूची विक्री आणि हातभट्टी दारूचे उत्पादन वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन जळगाव उत्पादन शुल्क विभागाने ऑक्टोबर २०२६ मध्ये जिल्हाभर छापे टाकण्याची मोहीम हाती घेतली होती. वेगवेगळ्या भागांत छापे टाकून अवैध दारू तयार करणाऱ्या, साठवणाऱ्या, वाहतूक करणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा जप्त
मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर बेकायदा दारूचा साठा हाती लागला. त्यात ३ हजार ८५६ लिटर हातभट्टी दारू सर्वाधिक होती. याशिवाय २८४ लिटर देशी दारू, २३८ लिटर ताडी, १८ लिटर विदेशी दारू आणि ४९ लिटर बिअर जप्त करण्यात आली. हातभट्टी दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे ८५ हजार ३४५ लिटर कच्चे रसायन (वॉश) घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. त्यामुळे बेकायदा दारू निर्मितीचे मोठे जाळे उध्वस्त करण्याच्या दृष्टीने विभागाला यश मिळाले.
बेकायदा दारूची वाहतूक आणि विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेली आठ वाहनेही विभागाने ताब्यात घेतली आहेत. छाप्यांमध्ये दारूचा साठा आणि इतर साहित्य मिळून एकूण ४४ लाख ८१ हजार ८७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. जिल्ह्यात बेकायदा दारू बनवणाऱ्या, विकणाऱ्या आणि तस्करी करणाऱ्यांविरुद्ध पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply