ऊसाला प्रतिटन ४५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या ३६ तासांपासून चक्काजाम आंदोलन सुरू असल्याने वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून ऊसदराचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षकही रस्त्यावर उतरले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवर बहिष्कार
ऊसदराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र शेतकरी संघटनांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे ऊसदराचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ही बैठक घेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी नागठाणे येथील आंदोलनस्थळी भेट दिली आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावर किणी आणि नागठाणे येथे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा निर्धार कायम असतानाच स्थानिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आंदोलनकर्त्यांच्या जेवणासह अन्य आवश्यक बाबींसाठी परिसरातील शेतकरी आणि व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करत आहेत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मानसिक बळ मिळत आहे.
वाहतुकीवर परिणाम आणि शेतकऱ्यांची नाराजी
या आंदोलनामुळे सातारा शहरातील वाढे फाटा ते शिवराज पेट्रोल पंप या महामार्गावर ट्रकांच्या रांगा लागल्या आहेत. सातारा शहरात ये-जा करणारी वाहतूकही अडचणींची झाली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये देण्याच्या मुद्द्यावरूनही आंदोलकांनी सरकारला धारेवर धरले आहे. मंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना दिली जाणारी पाच हजार रुपयांची मदत किती तोकडी आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासन आणि कारखानदारांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास चर्चेतून मार्ग काढण्यास आपण तयार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply