जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि माजी संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळवला आहे. कास येथे झालेल्या या निवडणुकीत रांजणे यांनी ४८ पैकी ३८ मते घेत मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना एका मताने पराभूत करून रांजणे राज्यभर चर्चेत आले होते. यावर्षी मात्र त्यांच्यासाठी निवडणूक तुलनेने सोपी ठरली. शशिकांत शिंदे यांनी या ठिकाणाहून माघार घेत त्यांचे समर्थक विठ्ठल गोळे यांना मैदानात उतरवले. त्याचवेळी रांजणे यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. एकूण ४८ पैकी ४६ मतदारांनी मतदान केले. गोळे यांना आठ मते मिळाली, तर त्यांच्या गटाचे एक मत ओळखपत्रातील अडचणीमुळे पडू शकले नाही. शशिकांत शिंदे मतदानासाठी हजर न राहिल्याने दोन मते त्यांना मिळू शकली नाहीत.
ठराव प्रक्रियेत तणाव, पण विजयाने वचपा
जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर ठराव प्रक्रियेवेळी जावळी तालुक्यात शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटांत जोरदार तणाव पाहायला मिळाला होता. संचालक पळवापळवी आणि ठरावावेळी गुद्दागुद्दी असे प्रकार घडल्याने निवडणुकीपूर्वीच चुरस निर्माण झाली होती. मात्र, मंत्री शिवेंद्रसिंहराजे आणि जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी ठराव प्रक्रियेत लक्ष घालून जास्तीतजास्त ठराव आपल्या बाजूने करून घेतले. त्यानंतर ठरावधारकांना तत्काळ सुरक्षितस्थळी सहलीला पाठवण्यात आले, त्यामुळे शशिकांत शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना राजकीय डावपेच खेळण्यास वाव राहिला नाही.
३८ मते घेत रांजणे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील पत्नीच्या पराभवाचा वचपाही काढला. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा पराभव झाल्याने रांजणे जावळीच्या राजकारणातून थोडे बाजूला पडले होते. मात्र, जिल्हा बँकेत निवडून येत त्यांनी ‘राजकारणातून अजून संपलेलो नाही’ हे दाखवून देत विजयाचा गुलाल उधळला. या विजयाने जिल्हा परिषदेतील पराभवातून बॅकफुटला गेलेले रांजणे पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत.
‘जावळीचा स्वाभिमान’ आणि पुढील राजकारण
शशिकांत शिंदे यांनी जावळीच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केल्यापासून शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाबरोबर त्यांचे खटके उडत आहेत. ‘जावळीचा स्वाभिमान’ या नावाखाली दोन्ही गटांकडून भावनिक राजकारण खेळले जात आहे. या निकालाने शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीवरील पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे, तर आगामी काळात शशिकांत शिंदे यांना येथे ताकदीने मैदानात उतरावे लागेल, हेच या निकालातून सिद्ध झाले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply