रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी नाशिक शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांत ३३६ मद्यपी वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकट्या ऑक्टोबर महिन्यात १२६ मद्यपी चालकांवर रंगेहाथ कारवाई झाली आहे.
सात क्रिटिकल कॉरिडॉर पथके कार्यरत
शहरातील ७ महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांतर्गत ७ क्रिटिकल कॉरिडॉर पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके शहरात सातत्याने कार्यरत असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध एकूण १६१५ केसेस करण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष मोहीम राबवून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात आली.
गेल्या वर्षाच्या तुलनेत कारवाईत मोठी वाढ
गेल्या वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबरअखेर मद्यपी वाहनचालकांवरील कारवाईत थेट २३५ ने वाढ झाली आहे. २०२५ या पूर्ण वर्षात मद्यपी चालकांवरील कारवाईची संख्या ११५ होती, तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ती १०१ होती. त्याविरुद्ध जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ मध्ये ही संख्या ३३६ वर पोहोचली आहे. रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही विशेष मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply