युरोपमधून मोठी बातमी समोर आली आहे. युरोप खंडातील तब्बल सात देशांमधील सुपरमार्केटवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी फ्रिजरला निशाणा बनवले आणि त्यामुळे अनेक ठिकाणी फ्रिजरचे तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्याचे पाहायला मिळाले.
हजारो फ्रिजरवर परिणाम, कुलिंग यंत्रणा ठप्प
बेल्जियम, लक्जमबर्ग, स्वीडन आणि एस्टोनिया यांसारख्या देशांतील सुपरमार्केटवर हा हल्ला झाला. बेल्जियम आणि लक्जमबर्गमध्ये सुपरमार्केट चालवणाऱ्या कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अचानक सायबर हल्ला झाला आणि त्याचा मोठा परिणाम हजारो फ्रिजरवर झाला. फ्रिजरमधील अन्नपदार्थ थंड ठेवण्यासाठी काम करणारी यंत्रणा अचानक ठप्प झाली आणि तिचे तापमान प्रचंड वाढले. फ्रिजरचे तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने मोठे नुकसान झाले. हा सायबर हल्ला असल्याचा प्राथमिक अंदाज कंपन्यांकडून वर्तवण्यात आला आहे.
स्वीडनकडून तपास, फ्रान्समध्येही असाच हल्ला
स्वीडनमध्येही अशाच पद्धतीने सुपरमार्केटवर हल्ला करण्यात आला. याबाबत स्वीडनच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राचे प्रमुख जॉन बिलॉव यांनी हा एक मोठा सायबर हल्ला असल्याचे सांगितले. त्यांची संपूर्ण यंत्रणा याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्येही असाच सायबर हल्ला झाला होता. अनेक देशांमध्ये फ्रिजरवर सायबर हल्ले होत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणि त्यामागील हल्लेखोरांबाबत तपास सुरू आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply