ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंजूर असलेल्या ३० रस्त्यांच्या कामांवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत या कामांपैकी केवळ ३५ ते ४० टक्के कामेच पूर्ण झाली असून, उर्वरित सुमारे ६० टक्के कामे ३१ मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त मनिषा खत्री यांनी दिले आहेत.
ध्वजारोहण सोहळ्यामुळे काही काळ दुर्लक्षित राहिलेल्या या कामांचा आता आयुक्तांकडून दैनंदिन आढावा घेतला जात आहे. अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना दररोज प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यांच्या कामांची टप्पानिहाय प्रगती तपासली जाणार असून, त्रयस्थ संस्थेकडून कामाच्या दर्जाची तपासणी केली जाणार आहे. गुणवत्तेत कोणतीही तडजोड आढळल्यास संबंधित ठेकेदारांना दंड आकारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
द्वारका-दत्तमंदिर रस्त्याबाबत मंगळवारी बैठक
द्वारका ते दत्तमंदिर या जवळपास सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २२१ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. सर्वात कमी दराची निविदा एका खासगी बांधकाम कंपनीला देण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरण करताना ९० टक्के रस्ता अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक असल्याचे निविदेत नमूद करण्यात आले आहे. या रस्त्याबाबत मंगळवारी (ता. ३) आयुक्तांनी ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, कार्यारंभ आदेश देऊन दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार आहे.
कामांची एकूण स्थिती
पहिल्या टप्प्यात १२३० कोटी रुपयांची एकूण ३० रस्त्यांची कामे मंजूर आहेत. या कामांवरील एकूण खर्च सुमारे १४०० कोटी रुपये अपेक्षित आहे. सध्याची प्रगती केवळ ४० टक्क्यांपर्यंत मर्यादित असून, मार्च २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे. ध्वजारोहणानंतर आता या ३० रस्त्यांच्या कामांवरच प्रशासनाचा भर असणार असून, द्वारका-दत्तमंदिर रस्त्याचे कामही तातडीने सुरू केले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply