नवी मुंबईत मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १० तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पालिकेकडून मुख्य जलवाहिन्यांवर विविध ठिकाणी व्हॉल्व्ह आणि फ्लोमीटर बसविण्याची तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत. या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून बेलापूर ते ऐरोलीपर्यंतच्या विभागांना त्याचा फटका बसणार आहे.
कोठे कोणती कामे होणार
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सानपाडा, वाशी, बेलापूर आणि शिरवणे परिसरातील मुख्य जलवाहिन्यांवर विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. सानपाडा मोराज सर्कलजवळील मुख्य जलवाहिनीवर ४०० मिमी व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह, तर सानपाडा सेक्टर ३० येथील जलवाहिनीवर २५० मिमी व्यासाचा स्लुईस व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे. वाशी सेक्टर १९ येथील सतरा प्लाझाजवळील मुख्य जलवाहिनीवर २५० मिमी व्यासाचा स्लुईस व्हॉल्व्ह, तर सेक्टर २२ येथील मुख्य जलवाहिनीवर ७०० मिमी व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम होणार आहे. बेलापूर सेक्टर २८ येथील पंपहाउसला जोडणाऱ्या ७०० मिमी व्यासाच्या इनलेट जलवाहिनीवर तसेच सेक्टर १५ येथील किल्ला जंक्शनजवळील मुख्य जलवाहिनीवरही बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहेत. याशिवाय शिरवणे गावाजवळील मुख्य जलवाहिनीवर फ्लोमीटर बसविण्याचे काम केले जाणार आहे.
कोणत्या भागांना फटका बसणार
बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तसेच सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. या कालावधीत बुधवारी, ४ नोव्हेंबर रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरंदवाड यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply