ऑक्टोबर महिन्याच्या उन्हाचा तडाखा सहन केल्यानंतर आता नाशिकमध्ये मिश्र स्वरूपाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरात कमाल तापमानामध्ये ३.२ अंश सेल्सिअसने घसरण झाली आहे, तर याउलट किमान तापमानात ३.३ अंश सेल्सिअसची वाढ नोंदविली गेली आहे. देशपातळीवरील वातावरणीय बदलांमुळे हा परिणाम झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
आठवड्याभरातील तापमानाचा आलेख
गेल्या रविवारी (२५ ऑक्टोबर) नाशिकचे किमान तापमान १८.३ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३४.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. रविवारी (१ नोव्हेंबर) किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३०.९ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. ऑक्टोबरच्या उन्हाच्या चटक्यामुळे कमाल तापमान थेट ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. परंतु वादळी स्थिती व भौगोलिक बदलांमुळे कमाल तापमानात घसरण नोंदविली आहे. दुसरीकडे किमान तापमान किरकोळ प्रमाणात वाढले आहे.
२६ ऑक्टोबरला किमान १६.२ व कमाल ३४ अंश, २७ ऑक्टोबरला किमान १६.२ व कमाल ३३.७ अंश, २८ ऑक्टोबरला किमान १४.३ व कमाल ३३ अंश, २९ ऑक्टोबरला किमान १८.९ व कमाल ३३.३ अंश, ३० ऑक्टोबरला किमान २० व कमाल ३२.५ अंश, तर ३१ ऑक्टोबरला किमान २१.६ व कमाल ३०.९ अंश तापमान नोंदविले गेले.
पुढील काही दिवस संमिश्र वातावरण
पुढील काही दिवस संमिश्र स्वरूपात वातावरण कायम राहणार असल्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान कमी झाले असले, तरी रात्रीच्या तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना वेगळाच अनुभव येत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply