वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. शहरातील उद्याने, रस्ते दुभाजक आणि हरित पट्ट्यांसाठी आता पिण्याच्या पाण्याऐवजी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या टर्शरी ट्रीटमेंट प्लांटच्या पाण्याचा वापर केला जाणार आहे.
कोपरखैरणे सेक्टर-१४ येथील मलप्रक्रिया केंद्रात जमा होणाऱ्या सांडपाण्यावर टर्शरी ट्रीटमेंट प्लांटद्वारे प्रक्रिया केली जाते. या पाण्याचा पुरवठा सध्या औद्योगिक क्षेत्रांसह कोपरखैरणे, घणसोली व ठाणे-बेलापूर रस्त्यावरील उद्याने व दुभाजकांसाठी केला जातो. वाशी विभागातील सेक्टर-१० येथे अमृत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. या झाडांना सध्या पिण्याचे पाणी दिले जात असून पाणी कमी पडल्यास झाडे वाळण्याची शक्यता आहे.
दररोज पाच लाख लिटर बचत
वाशी विभागातील उद्याने, दुभाजक आणि हरित पट्ट्यांसाठी कोपरखैरणे टीटीपी प्रकल्पातील प्रक्रियाकृत पाण्याचा पुरवठा केल्यास दररोज अंदाजे २.५७ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. वाशी परिसरातील ३० ते ३५ वर्षे जुन्या सोसायट्यांचा भविष्यात पुनर्विकास होणार आहे. यामध्ये फ्लशिंग व गार्डनिंगसाठी टर्शरी ट्रीटमेंट पाण्याची जोडणी दिल्यास आणखी २.५ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची बचत शक्य होईल. अशा प्रकारे या संपूर्ण योजनेमुळे दररोज तब्बल ५.०७ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होणार आहे.
१३.४८ कोटी रुपयांचा खर्च
या संपूर्ण प्रकल्पासाठी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेडकडून सविस्तर अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १३ कोटी ४८ लाख १० हजार २७७ रुपये हा पाच टक्के आकस्मिक खर्चासहित गृहीत धरला आहे. खोदकाम करणे, २५० मि.मी. व्यासाची एचडीपीई पाइपलाइन टाकणे, माती उचलणे, फ्लोमीटर बसवणे आणि वॉल्व्ह पुरवणे व बसवणे या कामांचा यात समावेश आहे. हे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरसूचीनुसार तयार करण्यात आले असून या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील मोलाच्या पिण्याच्या पाण्याची उधळपट्टी थांबून पाण्याचा शाश्वत वापर होण्यास मोठी मदत होणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply