ठाणे शहरात सण-उत्सवांच्या काळात सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांवर विद्युत दिव्यांच्या माळा, वायरिंग आणि सजावटीचे साहित्य लावले जाते. यामुळे झाडांसह त्यांच्यावर आश्रय घेणारे पक्षी, कीटक आणि अन्य जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. जिवंत झाडांवरील विद्युत रोषणाई आणि सजावटीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी निसर्गसत्ता पर्यावरण संस्थेने मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.
झाडांवर दिव्यांच्या माळा आणि वायरिंग लावल्यामुळे झाडांच्या सालीला इजा पोहोचते आणि त्यांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच झाडांवर राहणाऱ्या पक्षी, कीटक आणि अन्य सजीवांच्या अधिवासालाही धोका निर्माण होतो. झाडे ही केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारी नसून पर्यावरणीय संतुलन आणि जैवविविधतेचा महत्त्वाचा आधार आहेत, असे संस्थेचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाची दखल
या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी निवेदन वन विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे वर्ग केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदन वन विभागाकडे पाठविल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत सिनकर यांनी दिली आहे. आता याप्रकरणी वन विभाग काय भूमिका घेतो, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
झाडांचे रक्षण आवश्यक
झाडांचे पर्यावरणीय संतुलन राखण्यात मोठे योगदान असून त्यांचे रक्षण होणे आवश्यक आहे. विद्युत रोषणाईच्या नावाखाली झाडांना आणि निसर्गाला हानी पोहोचविण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका ठाण्यातील ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासकांनी मांडली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply