जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील उड्डाणपुलावरून भंगार घेऊन जाणारा कंटेनर शनिवारी रात्री सुमारे १०:५५ वाजता खाली असलेल्या हॉटेलवर कोसळला. या भीषण अपघातात कंटेनर चालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला. पुलाचा सुरक्षा कठडा तोडून कंटेनर थेट एकता हॉटेलवर पडल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले.
वळणाचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटले
औद्योगिक वसाहतीतून भंगार घेऊन निघालेला कंटेनर अंबड चौफुली येथे रस्ता चुकल्याने शहरात आला होता. तेथून रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असताना उड्डाणपुलावरील वळणावर चालकाचा अंदाज चुकला आणि कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनरने कठडा तोडला व खाली कोसळला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या, तर अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटलेली नव्हती.
याच वळणावर पूर्वीही अपघात; सुरक्षिततेचा प्रश्न
नूतन वसाहत उड्डाणपुलाच्या याच वळणावर २०१८-१९ मध्येही असाच अपघात झाला होता. त्या वेळी ट्रक कठड्यात अडकल्याने खाली पडला नव्हता आणि जीवितहानी झाली नव्हती. मात्र त्यानंतर कठडा तुटलेल्या अवस्थेतच होता आणि तीन-चार महिन्यांपूर्वी महापालिकेने तो नव्याने बांधला होता. तरीही पुन्हा भीषण अपघात झाल्याने उड्डाणपुलावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंटेनर हॉटेलवर पडले तेव्हा हॉटेलमध्ये कोणी दबले आहे का, याची रात्री उशिरापर्यंत खात्री झाली नव्हती; कंटेनर हटवल्यानंतरच ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply