सकाळची लगबग, नाशिक रोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची धावपळ, हातात डबा आणि खांद्यावर कार्यालयीन बॅग घेऊन गाडीची वाट पाहणारे नोकरदार — पंचवटी एक्स्प्रेसचा भोंगा वाजला की अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. मुंबईत नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कामांसाठी जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही केवळ रेल्वेगाडी राहिलेली नाही, तर ती त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे.
१९७५ पासून सुरू झालेला प्रवास
१ नोव्हेंबर १९७५ रोजी पंचवटी एक्स्प्रेस सुरू झाली. १९७० च्या दशकात नाशिक आणि मुंबईदरम्यान नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत होती. या प्रवाशांना वेळेत मुंबई गाठता यावे, या गरजेतून मध्य रेल्वेने ही गाडी सुरू केली. मुंबईत तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन झाले होते. पन्नास वर्षांचा टप्पा पूर्ण करून ही गाडी आता सुवर्णमहोत्सवानंतरच्या वाटचालीत पुढे जात आहे.
सुरुवातीच्या काळापासून बदलत्या तंत्रज्ञानासोबत या गाडीनेही कात टाकली. वाफेच्या आणि डिझेल इंजिनांच्या काळापासून विद्युत इंजिनांच्या युगापर्यंत भारतीय रेल्वेने मोठा प्रवास केला आणि पंचवटी एक्स्प्रेसही या बदलांची साक्षीदार ठरली. जुन्या डब्यांपासून आधुनिक एलएचबी डब्यांपर्यंत झालेला बदल, वातानुकूलित चेअरकारची सुविधा आणि डब्यांच्या रचनेतील बदल यामुळे तिचे स्वरूप बदलत गेले. २०१८ मध्ये या गाडीला नव्या स्वरूपातील डबे जोडण्यात आले होते.
सहप्रवाशांचे जिवाभावाचे नाते
मुंबईत नोकरी करायची, मात्र कुटुंबासह नाशिकमध्ये राहायचे, असा पर्याय अनेकांनी स्वीकारला. दररोज अप-डाऊन करणे अनेक नोकरदारांसाठी सोयीचे ठरले आणि काहींनी दशकानुदशके हा प्रवास केला. एका नोकरदाराने तब्बल ३३ वर्षे पंचवटी एक्स्प्रेसने ये-जा केल्याची आठवण या गाडीशी जोडलेल्या प्रवाशांच्या दीर्घ प्रवासाची साक्ष देते. या प्रवासात केवळ सहप्रवासी भेटले नाहीत, तर अनेकांना जिवाभावाचे मित्र मिळाले. रोज एकाच डब्यात, एकाच वेळी भेटणाऱ्या प्रवाशांमध्ये हळूहळू कौटुंबिक नाते निर्माण झाले. त्यामुळेच पंचवटी एक्स्प्रेस प्रवाशांसाठी केवळ प्रवासाचे साधन न राहता आपुलकीचे व्यासपीठ बनली आहे.
या गाडीच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवाशांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली ‘आदर्श कोच’ ही संकल्पना. गाडी स्वच्छ ठेवणे, शिस्त पाळणे आणि सहप्रवाशांप्रति जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हा त्यामागील उद्देश होता. या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही घेण्यात आली. प्रवाशांच्या सहभागातून रेल्वेगाडीला अधिक चांगले स्वरूप देता येते, याचे हे उदाहरण ठरले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply