अभिनेते प्रकाश राज आपल्या राजकीय विचारांबाबत स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात आणि त्यामुळे त्यांना अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. त्यांची पत्नी आणि नृत्यदिग्दर्शिका पोनी वर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, २०१७ मध्ये त्यांची मैत्रीण, कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर प्रकाश राज पूर्णपणे खचून गेले होते. मात्र याच घटनेने त्यांना ठाम भूमिका घेण्याची प्रेरणाही दिली. स्पष्टवक्तेपणामुळे प्रकाश राज यांना अनेकदा कामाचे नुकसान सोसावे लागले आहे, तरीही ते आपल्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीत, असे पोनी यांनी सांगितले.
पत्नीने काय सांगितले?
मुलाखतीत पोनी यांना विचारण्यात आले की, प्रकाश राज यांच्या राजकीय मतांमुळे त्यांना ज्या टोकाच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो, ते पाहता त्यांनी कधी प्रकाश राज यांना थोडा संयम राखण्यास सांगितले होते का. यावर पोनी म्हणाल्या की, सुरुवातीला त्यांना खूप भीती वाटायची. गौरी यांच्या हत्येची बातमी कळाली तेव्हा त्यांनी प्रकाश यांना पूर्णपणे कोलमडलेले पाहिले. प्रकाश खूप दुःखी होते आणि म्हणाले की, ते गौरी यांना वारंवार सावध करत होते. ज्याप्रमाणे आज प्रकाश यांच्या सुरक्षेची काळजी वाटते, तशीच काळजी त्यांना गौरी यांच्याबद्दल वाटत होती. गौरी यांच्या निधनाने त्यांना आतून पूर्णपणे हादरवून सोडले आणि त्यांनी ठरवले की, आता आपणही बोलले पाहिजे. एक स्त्री म्हणून गौरी ठामपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपले मत मांडले, हे पाहून प्रकाश प्रेरित झाले, असे पोनी यांनी सांगितले. कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती वाटायची तेव्हा प्रकाश त्यांना विचारायचे की, आपण किती काळ घाबरून जगायचे.
कारकिर्दीवर काय परिणाम झाला?
पोनी यांनी सांगितले की, त्यांच्या ओळखीचे काही अभिनेते असे होते ज्यांना प्रकाश राज यांचे वागणे आवडत नसायचे. आज सगळेजण आपापल्या आयुष्यात सुखात आहेत, शूटिंग करत आहेत आणि पैसे कमवत आहेत, असे त्या म्हणाल्या. काही अभिनेत्यांना काम न मिळण्याची भीती बाळगण्याची गरज नसते, कारण त्यांच्यामुळे इतरांना काम मिळते. प्रकाश राज यांच्या कारकिर्दीवर याचा मोठा परिणाम झाला असून, त्यांच्या हातातून जाहिराती गेल्या आणि चित्रपट काढून घेतले गेले. त्यांना व्यावसायिक आयुष्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला, तरी त्यांचे म्हणणे असे आहे की, त्यांचा विवेक सांगतो की जे घडत आहे ते चुकीचे आहे, त्यामुळे ते ते स्वीकारू शकत नाहीत. दरम्यान, प्रकाश आणि गौरी ३५ वर्षांहून अधिक काळ चांगले मित्र होते आणि २०१७ मध्ये बेंगळुरूमधील घरासमोर गौरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply