नाशिक येथील डावखुरा फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू सत्यजित बच्छावने रणजी ट्रॉफीत यंदा सिक्कीमकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. दुसऱ्याच सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्याने एका डावात पाच बळी घेतले. सामन्यादरम्यान अरुणाचल प्रदेशच्या दुसऱ्या डावात १७ षटकांत २७ धावा देत पाच फलंदाज बाद करण्याची अफलातून कामगिरी त्याने केली. त्यामुळेच सिक्कीमला अरुणाचल प्रदेशवर एक डाव आणि ३२८ धावांनी मोठा विजय मिळवता आला. या सामन्यात सत्यजितने एकूण सहा बळी घेतले.
यंदाच्या हंगामातील वाटचाल
त्याआधीच्या मेघालयविरुद्धच्या सामन्यात सत्यजितने ४५ धावा आणि एक बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या सामन्यात नागालँडविरुद्ध दोन्ही डावांत त्याने प्रत्येकी दोन बळी घेतले. भेदक गोलंदाजीबरोबरच खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीनेही संघाच्या धावसंख्येत सत्यजितने अनेक वेळा मोलाचा वाटा उचलला आहे.
महाराष्ट्र संघाकडून प्रदीर्घ कारकीर्द
सत्यजित बच्छावने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या रणजी स्पर्धेसोबतच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी या तिन्ही प्रकारांत २०१२ पासून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र संघाकडून महत्त्वाचा गोलंदाज म्हणून खेळताना त्याने विजय हजारे ट्रॉफीत ७५ पेक्षा जास्त बळी घेत सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रणजी ट्रॉफीत ३६ सामन्यांत डावखुऱ्या फिरकीच्या जोरावर महाराष्ट्र संघाकडून त्याने एकूण १३० बळी घेतले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply